कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सरंबळ सीमीदेव बसथांब्या नजीक दुचाकी व एसटी यांच्यात समोरासमोर घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार आयटी इंजिनियर शुभम विठ्ठल परब (26, रा. सरंबळ-देऊळवाडी) याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात रमेश शंकर दांडकर (55, रा. सरंबळ -साटमवाडी) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी 10.20 वाजता घडला असून याप्रकरणी कुडाळ एसटी आगाराचे एसटी चालक विजय नारायण म्हाडगुत (37, रा. आंबेरी) यांच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
कुडाळ आगाराची एसटी बस कुडाळ ते सरंबळ अशी बस चालक विजय नारायण म्हाडगुत हे घेवून जात होते. याचवेळी दुचाकीवरील युवक शुभम परब हा रमेश दांडकर यांच्यासह सरंबळ येथून कुडाळच्या दिशेने आपल्या ताब्यातील ज्युपिटर दुचाकीने येत होता. यावेळी सरंबळ सीमीदेव बसस्टॉप नजीक ते आले असता एसटी बसची शुभम परबच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक बसली. यामध्ये शुभम परबच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेतील शुभम परब व त्याच्या मागे असलेले रमेश दांडकर यांना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र यावेळी उपचारादरम्यान शुभम परबचा मृत्यू झाला.
शुभम परब आयटी इंजिनिअर असून पुणे येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. अलीकडेच तो आपल्या गावी आला होता. त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. शुभम घरातील एकुलता एक मुलगा असून तो घरातील एकमेव कमवता होता. मात्र काळाने घातलेल्या घाल्यात शुभमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी कुडाळ पोलीस स्टेशनचे कुडाळ पोलीस निरीक्षक मगदूम तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे, महिला पोलीस म्हापसेकर, बुथेलो यांनी भेट देत पंचनामा केला.