डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील पलावा जंक्शन पूलाचे काम कासवगतीने सुरू आहे. परिणामी या महामार्गावर वाहतूक कोडींसह जीवघेणे प्रदूषण आणि इंधनाचा अपव्ययाच्या समस्यांना प्रवासी, वाहन चालक आणि महामार्गाच्या दुतर्फा राहणार्या रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. या पुलाच्या बांधकामाला गती मिळावी यासाठी मनसेचे नेते तथा आमदार आमदार राजू आणि एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी या पूलाची पाहणी केली. यावेळी काम संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. या पुलावर अवघे चार मजूर काम करत असल्याचे पाहून आमदार राजू पाटील खवळले. रौद्र रूप धारण केलेल्या आमदारांनी अधिकार्यांसमक्ष ठेकेदाराचा खडेबोल सुनावले.
या दौर्यादरम्यान मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभाध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह पदाधिकारी, राजसैनिक उपस्थित होते. कोट्यावधी रूपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या पूलाच्या बांधकामाकरिता अवघे चार मजूर लावले आहेत. त्यामुळे हे काम होणार तरी कसे आणि कधी पूर्ण होणार ? असा संतप्त सवाल आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकार्यांकडे उपस्थित केला. यावर एमएसआरडीसीचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी दंड आकारून ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देऊन पुलाचे बांधकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
कल्याण-शिळ महामार्गावर एकीकडे सुरू असलेल्या मेट्रोचे काम, तर दुसरीकडे संथगतीने सुरू असलेली पलावा जंक्शन जवळील पुलाचे काम या दोन्ही कामांमुळे महामार्गाच्या दुतर्फा राहणार्या रहिवाशांसह प्रवासी आणि वाहन चालकांना वाहतूक कोंडीसह प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या पुलाच्या कामाला गती मिळावी यासाठी आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांच्यासह देसाई खाडीवरील पुल आणि पलावा जंक्शन जवळील पुल अशा दोन्ही पूलांची पाहणी केली. यावेळी आमदार यांनी पलावा उड्डाण पूलाच्या कामाआड येणार्या अवैध बांधकामाच्या संदर्भात अधिकार्यांशी चर्चा केली. हे बेकायदा बांधकाम लवकरच निष्कासित करण्यात येईल, असे आश्वासन अधिकार्यांनी यावेळी दिले आहे.
धक्कादायक प्रकार म्हणजे पुलाच्या कामासाठी एका बाजूला चार, तर दुसर्या बाजूला चार मजूर काम करत असतील तर पुलाची बांधणी आणखी काही वर्षे पुढे जाईल, याला जबाबदार कोण ? असा सवाल करत आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकार्यांसमोर संताप व्यक्त केला.