

डोंबिवली : पुण्यात पार पडलेल्या नॅशनल रॉ चॅम्पीयनशिपमध्ये डोंबिवलीतील दोन खेळाडूंची जागतिक रॉ पॉवर लिफ्टिंग ओपन एशिया फेडेरेशन (WRPF) या स्पर्धेत निवड झाली. डोंबिवलीतील पॉवर हाऊस जिमचे समीर जोगळेकर यांची मास्टर - 2 गटात, तर विजय हडगे यांची सब ज्युनियर गटात निवड झाली आहे.
तसेच मुंबईचे मास्टर महिला गटात प्रतिभा तावडे, वृंदा राणे, निता नावर, अर्चना गोलकर, सरीता कदम, रामदिन नंदकिशोर, सब ज्युनियर व ज्युनियर गटात परी अहिर व मानसी अहिर यांची निवड झाली. तसेच मास्टर पुरुष गटामध्ये पार्ल्याचे जितेंद्र अहिर, संभाजी अंकर्लेकर व शंकर ठाकूर, तर सातार्याचे प्रमोद पाटील, स्मिता पाटील आणि दर्शन देशमुख यांची निवड करण्यात आली.
सिनियर महिला गटात दया हदीया, तर धुळ्याची कुलश्री कोळी व सोनम कतरी या सर्वांची निवड युपीएफआयच्या महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी सचिन तापडे, युनायटेड पॉवर लिफ्टिंग फेडरेशनचे पदाधिकारी धर्मेश पटेल, अल्ताफ शेख व सचिन तापडे यांनी केली.
युनायटेड पॉवर लिफ्टिंग ही स्पर्धा 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान सुरत येथे खेळविण्यात येणार आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी रॉ पॉवर लिफ्टिंग ओपन एशिया फेडेरेशन या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.