

ठाणे : स्पेशल चाईल्ड आहे म्हणून तो काहीच करू शकणार नाही अशी शंका अनेकांच्या मनात उपस्थित होत असली तरी, आपल्या पाल्याच्या अंगी गुण ओळखून, त्याच्यातील कौशल्य अधिक खुलवण्याच्या प्रयत्नामुळे पुणे आणि कोल्हापुरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॅराथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या मयुरेश कोटियन याने 100 आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धात सुवर्ण पदक पटकावले असून, यापूर्वी देखील अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.
वाघबीळ येथे रहाणार्या मयुरेश कोटीयन (24) याचे श्री मा स्नेहदिप शाळेच्या स्पेशल चाईल्ड वर्गात शालेय शिक्षण झालं आहे. लहानपणापासून मयुरेश धावण्यात चपळ होता. त्यामुळे शाळेतील धावण्याच्या स्पर्धेत देखील त्याची उल्लेखनीय कामगिरी होती. आपला मुलगा स्पेशल चाईल्ड आहे. पुढे त्याचे कसे होणार याची चिंता कोटीयन कुटुंबाला होती. मात्र, मयुरेशने दुसर्यावर विसंबून राहू नये, स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी चेंबूर येथील एनएएसईओएच नेशॉ इन्स्टिट्युटमध्ये तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी दाखल केलं.
मयुरेश मधील धावण्याची चपळता कोटीयन कुटुंब जाणून होत. त्यामुळे तांत्रिक शिक्षणा बरोबर धावण्याचा सराव सुरूच होता. एनएएसईओएच इन्स्टिट्युट मधून छोट्या छोट्या अॅथलेटिक्स इव्हेंट स्पर्धा मयुरेश गाजवत होता. अशातच कोटीयन कुटुंबाला पॅरा थलेटिक्स आदी स्पर्धांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार मुलाच्या भविष्याचा विचार करून अॅथलेटिक्स प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मयुरेश सराव करू लागला, सध्या तो राष्ट्रीय प्रशिक्षक जितेंद्र लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्सचे धडे गिरवत आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या स्पेशल चाईल्ड अॅथलेटिक्स 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आला होता. तर 21 आणि 22 डिसेंबर रोजी कोल्हापूर मध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीच्या मैदानावर झालेल्या पॅरालिंपिक स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय थलेटिक्स स्पर्धेतील 100 आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत मयुरेश याला सुवर्ण पदक मिळाले आहे.