

कासा (ठाणे) : डहाणू-कासा राज्य महामार्गावरील चारोटी परिसरात शुक्रवारी (दि.18) रोजी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली. यामागील कारण ठरली ती पोलिसांची प्लेट असलेले एक खासगी वाहन. जे मुख्य रस्त्याच्या मध्यभागी पार्क करण्यात आली होती. खुद्द पोलीसांच्या या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डहाणू परिसरात सध्या प्रसिद्ध महालक्ष्मी मातेची यात्रा सुरु आहे. या यात्रेसाठी दररोज सायंकाळच्या वेळेस हजारो भाविक विविध खासगी वाहनांनी प्रवास करत असतात. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास या मार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहतूक दिसून येते. शुक्रवारी संध्याकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास, चारोटी उड्डाणपुलाजवळ कासा-डहाणू मार्गावरील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी पार्क करण्यात आलेली पोलिसांची प्लेट असलेली खासगी कार वाहतूक कोंडीचे कारण ठरली. परिणामी, दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.
वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांचे असताना, त्यांच्याच नावाने असलेली कार नियमांचे उल्लंघन करत रस्त्याच्या मध्यभागी लावल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. जे नियम सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत, तेच नियम पोलिसांसाठी का नाहीत? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. कोंडीमुळे वाहनचालकांना तासनतास रस्त्यात अडकून राहावे लागले. काही प्रवाशांनी वैतागून गाडीतून उतरून रस्त्याच्या बाजूने चालत जाणे पसंत केले. या सगळ्या प्रकारामुळे रस्त्यांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
चारोटी येथील उड्डाणपुलाजवळ नेहमीच वाहतूककोंडी होत असते, मात्र शुक्रवारी संध्याकाळी कासाकडे जाणार्या रस्त्यावर माध्यभागी पोलिस प्लेट असणारी एक खाजगी कार माध्यभागी लावल्याने मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
सुरेश पाडवी, अध्यक्ष आदिवासी एकता सेवा संस्था अध्यक्ष, नाशिक.
स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित वाहनधारकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. याबाबत कासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे यांना विचाराणा केली असता याबाबत आपण चौकशी करून तसेच चारोटी तेथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल असे सांगण्यात आले.