विक्रमगड : पालघर जिल्हा म्हणजे भाताचे कोठार. जिल्ह्यात पूर्वी लागवडीला सुरुवात झाली म्हणजे जणू घरात सणच असायचा. भात आगवडीला सुरुवात करताना सर्व माणसांना चिकन- मटणाचे जेवण त्याचबरोबर जेवणाबरोबर तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या गोड उंडे दिले जात असत. एकदा भात लागवडीला सुरुवात झाली की शेतामध्ये मधूर लोकगीतांचे स्वर कानी पडायचे. भात लावणी करणार्या महिला मजुरांकडून लयबद्ध म्हटली जाणारी लोकगीते घटकाभर थांबून ऐकायचा मोह कुणाला होणार नाही? माञ मात्र काळाच्या ओघात जेवणांबरोबरच भात लागवड करताना म्हटली जाणारी लोकगीते देखील आता कालबाह्य झाली आहेत.
शेती म्हणजे काळ्या आईची सेवा सेवा करताना परमेश्वराची सेवा करतो, असा सार्थ भाव लोकगीतातून प्रकट व्हायचा. तो भावही आता राहिला नाही. लागवड करताना शरीर मोठ्या प्रमाणात थकते. माञ या सुमधुर - लोकगीतांमुळे शरीराला होणार्या वेदना कमी होतात, याची ग्वाही आंतरमन देते.
सकाळपासूनच धान रोवणीच्या कामात गुंतलेल्या काही महिला लोकगीतांची सुरुवात करताच, त्या सुरांना सुरेल साथ सर्व महिलांकडूनच मिळायची व लोकगीतांची रंगत चढायची. त्यामुळे माथ्यावर आलेला सूर्य कधी पश्चिमेला मावळला, हेसुद्धा कळत नव्हते. आता सगळे श्रम घड्याळाच्या काट्यावर आणि मोबाइल तालावर झाले आहेत. शेतशिवारात कधी लोकगीतांची सुरेल धूम तर, कधी कथा - कहाण्यांची मैफील रंगायची.
म्हातारपणात आपल्या आई-वडिलांची सेवा करणारा श्रावण बाळ, सत्यवचनी राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद, राम सीता, कृष्ण सुदामा अशा अनेक पौराणिक कथांमधून समाजात चांगल्या मूल्यांची पेरणी होत असे.
या सगळ्या बाबींचा प्रभाव आधुनिकतेच्या नावावर कमी होत असताना ग्रामीण भागात एकमेकांप्रती असलेला आपुलकीच्या झरा आता आटायला लागला आहे. शेताच्या बांधावर लोकगीतांची धूम ऐकायला मिळत होती हे फक्त सांगण्यापुरते उरले असून ही सर्व लोकगीते लुप्त पावली आहेत. अत्याधुनिक यंत्राने शेती करण्याच्या या युगात परंपरागत रितीरिवाजही मागे पडत असल्याचेही जाणकार सांगतात.