

ठाणे : शुभम साळुंके
महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य असेल असा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला अनेक स्तरावरुन विरोध सुरु आहेत. त्यातच आता आगरी साहित्यिक सर्वेश तरे यांनी एक मागणी केली आहे.
हिंदीच्या सक्तीऐवजी जिल्हानिहाय मराठीच्या बोलीभाषांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही बोली भाषांची मागणी करताना त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या २०१७ च्या कला शाखेच्या पदवीसाठी मराठी साहित्य अभ्यासक्रमात आगरी, मालवणी आणि वाडवळ या भाषांचा समावेश केल्याचा दाखला दिला आहे. त्यामुळे सरकारच्या तिसऱ्या भाषेच्या निर्णयाला दिलेला पर्याय सर्वत्र चर्चेला आला आहे.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता हिंदी भाषा सक्तीमुळे वादंग निर्माण झाला आहे. यंदाच्या नव्याने सुरु होणाऱ्या शैक्षणिक २०२५- २६ मध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थांना हिंदी शिकणं बंधनकारक करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाकडे शैक्षणिक दृष्ट्या पाहिलं जात नाही तर राजकीय दृष्ट्या देखील पाहिलं जात आहे. या शासनाच्या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया देखील आणलेल्या आहेत. राजकीय पक्षांसह अनेक शिक्षक संघटनांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे. या सुरु असलेल्या हिंदी भाषेच्या तिसऱ्या पर्यायाला आगरी साहित्यिक सर्वेश तरे यांनी नवा पर्याय दिला आहे.
शासनाला पर्याय देत असताना त्यांनी मिश्किल भाषेत सरकारला चिमटा देखील काढला आहे. ते म्हणाले की, हिंदीच्या सक्ती ऐवजी जिल्हानिहाय मराठीच्या बोलीभाषांचा समावेश करा ! २०१७ ला मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या पदवीसाठी मराठी साहित्य अभ्यासक्रमात आगरी,मालवणी आणि वाडवळ या बोलीभाषांचा समावेश केला आहे. हाच प्रयोग त्या त्या भागातील स्थानिक बोलींना घेऊन जिल्हानिहाय मराठीच्या बोलीभाषांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करा ! तेव्हा कुठे मराठी " अभिजात" म्हणून मिरवता येईल ! मराठीला समृद्ध करणाऱ्या बोली आधी जपूया ! मग परप्रांतातील भाषेची ओझी वाहू असं सर्वेश तरे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.