Thane News | संततधारेने तानसा धरणाची पातळी वाढली

Thane Tansa Dam : नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा, धरणांमध्ये समाधानकारक पाऊस
तानसा धरण
तानसा धरणpudhari news network

ठाणे : गेले दोन दिवस मुसळधार पावसाने जोर धरला असून मुंबई शहराला पाणी पुरवठा करणार्‍या तानसा धरणासह अप्पर वैतरणा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी धरण तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी 21 जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे तानसा धरणाच्या पाणी पातळीत 116,326 एवढी वाढ झाली आहे. यामुळे तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता लक्षात घेता तानसा नदी काठावरील ठाणे व पालघर जिल्ह्यातील 33 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मीटर्स टीएचडी इतकी निश्चित केली आहे. सध्या तानसा धरण हे 80.50 टक्के एवढे भरलेले आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत आहे. याकडे लक्ष केंद्रीत करून तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्यात न उतरण्याच्या सूचना देऊन सावधानतेचा इशारा तानसा नदी काठावरील गावांना देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 18 गावे व पालघर जिल्ह्यातील 15 गांवांना सावधानतेचा इशारा आहे.

तर अप्पर वैतरणाची पाणी क्षमता ही 2,27,047 एवढी असून 21 जुलै रोजी पडणार्‍या मुसळधार पावसामुळे वैतरणातील पाणीसाठा 23,841 दशलक्ष लीटर एवढा झाला आहे. मोडक सागरची पाणीक्षमता ही 1,28,925 एवढी असून 21 जुलै रोजी या तलावातील पाणीसाठा हा 77,935 एवढा झाला आहे. मध्य वैतरणाची पाणीपातळी क्षमता ही 1,93,530 एवढी असून रविवारी हा पाणीसाठा 75,903 एवढा झालेला दिसून आला. विहारची पाणी पातळी क्षमता ही 27,698 एवढी असून मुसळधार पावसामुळे विहारच्या पाणी साठ्यात 19,812 एवढी झाली आहे. तर तुळशी तलावाची पाणी पातळी क्षमता ही 8,046 एवढी असून 21 जुलै रोजीच्या पावसाने तुळशी तलाव 8,046 एवढा संपूर्ण भरला आहे.

तानसा धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर

दरम्यान, तानसा धरण क्षेत्र 80.50 टक्के एवढे भरले असून पाणी पातीळीतील वाढ लक्षात घेता, तानसा धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या तानसा धरणाखालील व तानसा नदी लगतच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना, रहिवाशांना तानसा धरण भरून वाहण्याची कल्पना देऊन सावध राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, तहसील कार्यालये, पोलीस यंत्रणा व परिसरातील अधिकार्‍यांना आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे.

या गावांना सतर्कतेचा इशारा

  • शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नेवरे, वेलवहाळ, डिंबा, खैरे ही गावे, तर भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळुंगे, गणेशपुरी आदी गावे तानसा नदी काठावर आहेत.

  • पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील निभावली, मेट, गोराडे ही गावे. वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरली, अदने, पारोळा, अंबोडे, बँकांचे, साईवान, काशीत-कोरगांव, कोपरगांव, हेडावडे आणि चिमणे आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news