

ठाणे : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणात अव्वल नंबर मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली असून यासाठी आता शहरातील गल्लीबोळांचीही स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. यासाठी दोन स्वीपिंग 4 मशिन्स घेण्याचा पालिकेच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला असून या मशिन्स खरेदीसाठी साडेसहा कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. (Deciding to mechanize sanitation)
ठाणे शहरात सुमारे 380 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग व घोडबंदर रोडच्या सफाईकरीता यापुर्वीच दोन रोड स्विपिंग मशीन भाडेतत्वावर घेण्यात आलेले आहेत. आता मुख्य हायवे व घोडबंदर रोड वगळता शहराच्या आतील चौपदरी रस्ते तसेच छोट्या रस्त्यांची जिथे शक्य असेल तिथे यांत्रिकी मशीन द्वारे साफसफाई करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अव्वल येण्यासाठी पालिकेने कंबर कसली असल्याने शहरातील उपरस्त्यांची दैनंदिन साफसफाई यांत्रिक मशीनद्वारे आदेश देण्यात आले आहे. तसेच स्वच्छ हवा, कृती आराखडा अंतर्गत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ नियंत्रणात आणण्यासाठी स्विपींग मशीनचा वापर होणार आहे.
शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ खुप जास्त प्रमाणात असल्यामुळे दुभाजक, रेलिंग व कर्बस्टोन यांच्यावर तेलयुक्त कार्बन व धूळ मोठ्या प्रमाणात साचलेली असते. ही धूळ मनुष्यबळाद्वारे साफ करणे शक्य होत नसल्याने मशीनद्वारे चकाचक करण्यात येणार आहे. शहरात प्रत्यक्ष काम करणार्या सफाई कामगारांची संख्या साधारणपणे 2 हजार असुन दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, नव्याने विकसित होणारे रस्ते व निर्माण होणार्या कचर्याचे प्रमाण विचारात घेता विभागाकडील कामगारांची संख्या अपुरी आहे. दरम्यान स्विपिंग मशिन्सच्या माध्यमातून रस्त्याची जास्तीत जास्त सफाई करण्यावर भर दिला जाणार आहे.