

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली 90 फुटी रोडला कचोरे गावात असलेल्या वीर सावरकर नगर येथील एका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शाखा भरते. या शाखेतर्फे 35 बालकांचे विविध खेळ स्पर्धांचे प्रशिक्षण शिबीर महिनाभरापासून घेतले जाते. या शाखेवर रविवारी (दि.9) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी तुफान दगडफेक केली. या हल्ल्यातून बालके बचावली असून कचोरे संघ शाखा चालकांच्या पुढाकारातून टिळकनगर पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
संजू चौधरी हे कचोऱ्यातील वीर सावरकरनगर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालवितात. या शाखेत कचोरे आणि ठाकुर्ली परिसरातील जवळपास 35 लहान-मोठी मुले संध्याकाळी खेळांचे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. या मुलांना प्रशिक्षक पवन कुमार विविध प्रकारचे खेळ शिकवतात. गेल्या महिनाभरापासून वीर सावरकर नगर भागातील चौधरी वाडी मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे.
यापूर्वी एक-दोनदा वेळा हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना अज्ञाताने दगडफेक केली होती. पण चुकून दगड आले असावेत म्हणून त्याकडे चालकांनी दुर्लक्ष केले. रविवारी (दि.9) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संघाचे स्वयंसेवक मैदानात विविध प्रकारच्या लाठ्या-काठ्या खेळाचे प्रशिक्षण घेत होते. मैदानी खेळात काही मुले व्यस्त असतानाच अचानक चौधरी वाडी मैदानातील झाडा-झुडपांमधून स्वयंसेवकांच्या दिशेने दगड भिरकावण्यात आले. सुरुवातीला चुकून दगड चुकून कुणी फेकला असावा, असा संशय संघ चालकांना आला. त्यानंतर मात्र दगड फेकण्याचे प्रमाण वाढल्याने लहान मुले घाबरली. हेतुपुरस्सर त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला जात असल्याचा संशय व्यक्त करून संघ शाखा चालक संजू चौधरी आणि पवन कुमार यांनी या दगडफेकीत कुणा स्वयंसेवकाला इजा होऊ नये म्हणून मैदानी खेळ बंद केले. त्यानंतर या दोघांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या संदर्भात टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांनी सांगितले, कचोरे गावच्या मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही मुले विविध प्रकारचे खेळाचे प्रशिक्षण घेत होती. त्यावेळी तेथे कुणीतरी दगडफेक केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या घटनेचा तपास सुरू केला आहे.
कचोऱ्यात घडलेल्या घटनेचे पडसाद डोंबिवलीतील विविध संघ शाखांमध्ये उमटले असून स्वयंसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार करणाऱ्या अज्ञातांना अटक करून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी स्वयंसेवकांनी केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कचोरे भागात बंदोबस्त तैनात केला आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास या भागात धाक-धमक्या देऊन दहशत माजविण्याचे प्रकार घडल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी संबंधितांवर प्रतिबंधकात्मक कठोर कारवाईचा बडगा उगारावा, अशीही मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.