

तलासरी : तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेतून महिला बचत गटाच्या नावे परस्पर कर्ज काढून लाखोंचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये बँकेच्या कर्मचार्यांनी हा प्रकार केल्याने महिला बचत गटांनी याबाबत तलासरी पोलिसात तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तलासरी स्टेट बँकेत हा धक्कादायक प्रकार बघितल्यानंतर तालुक्यातील महिला बचत गटात फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
तलासरी तालुक्यात असलेल्या भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेत तालुक्यातील विविध भागातील 65 आदिवासी महिला बचत गटांचे खाती आहेत. यामध्ये एकूण सहा बचत गटांच्या नावे परस्पर कर्ज काढून बँकेच्या कर्मचार्यांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तलासरी तालुक्यातील हिमालय महिला स्वयंसेवक बचत गटाच्या नावे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, बोगस कागदपत्रांद्वारे तलासरी स्टेट बँकेतून 5 लाखाचे परस्पर कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बचत गटाच्या अध्यक्षा तसेच सदस्यांनी या गैरव्यवहाराची तक्रार तलासरी पोलीस ठाण्यात दाखल केली असून, संबंधित बँक कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तलासरी तालुक्यातील वरवाडा येथील हिमालय महिला बचत गटाच्या तक्रारी नुसार तलासरी येथील स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यावरून 31ऑगस्ट 2023 रोजी पाच लाख रुपये कर्ज काढण्यात आले. मात्र, बचत गटातील कोणत्याही सदस्याला या कर्जाची माहिती नव्हती. त्यानंतर त्याच दिवशी 31 ऑगस्ट 23 रोजी बचत गटाच्या खात्यातून ही रक्कम दुसर्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे उघडकीस आले.
तब्बल एक वर्षा नंतर 5 नोव्हेंबर 2024 रोजी महिला बचत गटांच्या खात्यामधून 76 हजार रुपये कर्ज वसुली म्हणून कापून घेतले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपये कर्ज वसुली करण्यात आली आहे. कोणतेही कर्ज न घेता आतापर्यंत असे एकून 81 हजार रुपये हिमालया बचत गटाच्या खात्यातून कर्ज वसुली करण्यात आले आहे.
याबाबत बचत गटाच्या अध्यक्षा आणि सदस्यांनी बँकेत चौकशी केल्यानंतर त्यांना बँकेच्या व्यवस्थापनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच लेखी तक्रार अर्जही घेण्यास नकार दिला. कर्ज व्यवहारात कागदपत्र किंवा गटाच्या कोणत्याही सदस्याच्या स्वाक्षर्या घेतल्या नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे हा बोगस कर्ज प्रकरण असून, यात बँकेतील कर्मचार्यांचा सहभाग असल्याचे गटाच्या सदस्यांनी पुढारीशी बोलतांना सांगितले. तर न घेतलेल्या कर्ज वसुली करण्यासाठी बँकेकडून नोटीसा देऊन तगादा लावला जात आहे.
हिमालय बचत गटाने कोणतेही कागदपत्र न देता. बँकेने त्यांच्या नावाने 5 लाखाचे कर्ज मंजूर करून ती परस्पर दुसर्या खात्यात वळती केल्याने हा सरळसरळ अपहार असल्याचे तक्रारदारां बचत गटाचे म्हणणे आहे. याबाबत बचत गटाच्या पदाधिकार्यांनी तलासरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असून, बँकेच्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि अपहारातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात बँकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या कर्ज प्रकारानंतर स्टेट बँकेच्या व्यवहारांबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे. जर महिला बचत गटाने कर्ज घेतलेच नाही, तर बँकेने कशाच्या आधारावर ते कर्ज मंजूर केले? गटाच्या सदस्यांच्या स्वाक्षर्या नसताना कर्ज वितरित कसे झाले? आणि ही रक्कम दुसर्या खात्यात का ट्रान्सफर करण्यात आली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
बँक कर्मचार्यांची भूमिका संशयास्पद असून या कर्ज प्रकरणात स्टेट बँकेचे तत्कालीन मॅनेजर अमित कुमार आणि कर्ज विभागातील कर्मचारी राहुल धनावडे यांनी महिला बचत गटाचे कागदपत्र, सह्या न घेता, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, बनावट दस्तऐवजांच्या आधारे कर्ज मंजूर केले आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गटाच्या कोणत्याही सदस्यांना बैठकीसाठी बोलवले गेले नाही, तसेच गटाने कोणताही ठराव मंजूर केला नव्हता. तलासरी स्टेट बँकेतील कर्ज प्रकरण घोटाळा उघडकीस आल्यानंतर तालुक्यातील बचत गटातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.