Thane News | दंडवसुली विरोधात रिक्षाचालकांचा संप

ठाण्यात रिक्षा स्टँडवर रिक्षा नसल्याने प्रवाशांचे हाल
Rickshaw drivers strike
वाहतूक विभागाकडून आकारण्यात येणार्‍या भरमसाठ दंडा विरोधात ठाणे शहरातील रिक्षा चालकांनी सोमवारी संप पुकारला.pudhari news network
Published on
Updated on

ठाणे : वाहतूक विभागाकडून आकारण्यात येणार्‍या भरमसाठ दंडा विरोधात ठाणे शहरातील रिक्षा चालकांनी सोमवारी (दि.5) संप पुकारल्यामुळे शेअर रिक्षाने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल झाले. रिक्षा थांब्यांवर रिक्षा उपलब्ध नसल्याने प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

ठाणे शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणार्‍या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणार्‍या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या रिक्षा चालकांकडून 1500 रुपये दंड आकारला जात आहे. दररोज मिळत असलेल्या उत्पन्नातून आर्धी रक्कम दंडाला जात असल्यामुळे अनेक रिक्षा चालक त्रासले आहेत. दंड स्वरुपात आकारण्यात येणारी रक्कम पूर्वी सारखी कमी करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरु लागली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर, 5 ऑगस्ट पासून बेमुदत रिक्षा संप पुकारला जाईल असा इशारा काही शेअर रिक्षा चालकांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर शहरातील रिक्षा संघटनांनी रविवारी खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली.यावेळी संप पुकारलेले काही रिक्षा चालक उपस्थित होते. या बैठकीत रिक्षा चालकांची समजूत काढण्यात आली आणि रिक्षा चालकांनी ही आम्ही संप मागे घेतो असे जाहीर केले होते. मात्र, सोमवारी शेअर रिक्षा चालकांनी संप पुकारला. यामुळे शहरातील विविध भागातील शेअर रिक्षा थांब्यांवर सोमवारी रिक्षा उपलब्ध नव्हत्या. रिक्षा नसल्यामुळे थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. तर, काही प्रवाशांनी टीएमटी बसने प्रवास करण्याचे ठरविल्यामुळे बस थांब्यावरही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या रिक्षा चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

शहरातील स्थानक परिसरात वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, यशोधन नगर, किसननगर, अंबिका नगर, कामगार अशा विविध भागातील शेअर रिक्षा थांब्यांवर रिक्षा नसल्याचे दिसून आले. ऑटोमॅटिक जवळ असलेल्या शेअर रिक्षा थांब्यावर रिक्षा चालक रिक्षासह उभे होते. परंतू, त्यांनी रिक्षा बंदचा मोठा फलक त्याठिकाणी ठेवला होता. ते कोणतेही प्रवासी भाडे स्विकारत नसल्याचे दिसून आले. तर, वागळे इस्टेट परिसरात मोठ्या संख्येने औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये ठाणे शहरासह इतर शहारातील नागरिक नोकरीसाठी येतात. स्थानक परिसरातील बी कॅबिन भागातून वागळे इस्टेट येथे येण्यासाठी शेअर रिक्षा स्टँड आहे. संपामुळे या थांब्यावर एकही रिक्षा नसल्याचे दिसून आले. वागळे इस्टेट भागात जाणारे प्रवाशांनी रिक्षाच्या शोधात बी कॅबीन परिसराच्या चौकात गर्दी केली होती.

बेशिस्त रिक्षाचालकांवर जी दंडात्मक कारवाई केली आहे ती कायदेशीर आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून लोकआदालत प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे. त्यात, रिक्षा चालकांचा दंड जास्तीत जास्त कमी करण्याचे निवेदन आम्ही न्यायालयाला देणार आहोत.

विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

आयटी कर्मचार्‍यांसाठी टीएमटीच्या 37 बस

वागळे इस्टेटमधील शेअर रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी अचानक संप पुकारल्यामुळे बी-केबिन येथून कामावर निघालेल्या आयटी कर्मचार्‍यांचे अतोनात हाल झाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या विनंतीनंतर टीएमटी प्रशासनाने 37 जादा बस सोडल्यामुळे कर्मचार्‍यांची सोय झाली. त्याबद्दल आयटी कर्मचार्‍यांकडून संजय वाघुले यांचे आभार मानण्यात आले.

रिक्षाचालकांची घोषणाबाजी

संपामुळे प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन काही लोकप्रतिनिधींना वाहतूक पोलीस नियंत्रण विभागात सोमवारी दुपारच्या सुमारास धाव घेतली. शहरातील शेअर रिक्षाचालकांनी वाहतूक विभागाबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. यावेळी लोक प्रतिनिधींनी वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेतली आणि रिक्षा चालकांचे म्हणणे त्यांच्या समोर मांडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news