

भिवंडी : शहरातील मानकोली रोड येथील वळगाव या ठिकाणी मुंबईच्या आयपी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बनावट फेविकॉल तयार करून ते ग्राहकांना विकून फसवणूक करणाऱ्या गोदामावर छापा टाकून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करीत गोदाम मालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उमेश शत्रुघ्न रेवंडकर (रा. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या गोदाम मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वळगाव येथील पारसनाथ कंपाऊंडमधील
गोदामात पिडीलाईट इंडस्ट्रीज लि. रिजेंट चेंबर्स या कंपनीचे उप उत्पादन फेविकॉल व फेव्हीक्विक या ब्रँडची हुबेहूब नक्कल व रंगसंगती असलेले बनावट फेविकॉल व फेव्हीक्विक तयार केला जात असल्याची गुप्त माहिती मुंबई येथील इनवेस्टीगेशन अँड डीटेक्टीव्ह सर्व्हिसेस प्रा. लि. (आयपी) कंपनीला मिळाली होती, त्यानुषंगाने आयपी कंपनीचे तपासी अधिकारी दिनेश शेट्टी त्यांचे सहकारी मुख्य तपासी अधिकारी फकरुद्दीन शेख, रिजनल ऑफिसर आदिल पटेल, गुमा-मुख्य तपासी अधिकारी जितू महादेव, तपासी अधिकारी रवी लालचंद वासवाणी, सर्व्हे ऑफिसर दीपाली पाटील आदी पथकाने नारपोली पोलिसांच्या मदतीने 7 डिसेंबर रोजी छापा टाकला.
या छापामध्ये 11 हजार रुपये किमतीचे फेविकॉल एम आर या 20 ग्रॅम प्लास्टिकचे 500 रुपयाप्रमाणे 22 रोल, फेविकॉलने भरलेल्या 11 हजार 100 रुपयांच्या 555 प्लास्टिक बाटल्या, पिडीलाईट नाव असलेले प्लास्टिकचे 2 रोल, प्लास्टिक बॉटल ठेवण्याचे 7 पॅकिंग पुढे, 12 हजार किमतीचे पिवळ्या व निळ्या रंगाचे 12 रोल, 60 हजार रुपयांची बॉटलवर लेबल लावण्याची इलेक्ट्रिक मशीन, 1 लाख 20 हजारांचे फ्लेक्स क्विक नावाचे 10 बॉक्स, 1 लाख 1 हजार 600 रुपये किमतीचे 16 मोठे रिकामे बॉक्स तसेच बनावट उत्पादनाकरिता लागणारा सामान असा एकूण 2 लाख 17 हजार 575 रुपयांचा बनावट मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गोदाम मालक उमेशच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात (आयपी) तपासी अधिकारी दिनेश शेट्टी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.