

वसई : वसई विरार शहराच्या गांव पट्टीत मूलभूत सोयीसुविधाचा अभाव आणि समस्यांचा सवत्र बोजवारा असताना येथील जनतेकडून हजारो रुपये घरपट्टी पालिका वसूल करीत आहे.
घरपट्टी बिलाची वसई विरार मनपा कडून आगाऊ नोटिस दिल्या जाताना दिसत नाहीत. मागच्या वर्षीही अशाच नोटीस मिळाल्या नव्हत्या. यामुळे लोकांना वेळेवर घरपट्टी भरता येत नाही. लोकांना वेळेवर घरपट्टी भरता येत नाही. व नाहक त्याना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागते. अशा या भोंगळ कारभारासाठी येथील जनतेस हजारो रूपये घरपट्टी भरावी लागत आहे.
अशातच लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनास जाब विचार कोण ? थोडक्यात नाव महानगरपालिका, परंतु कारभार मात्र ग्रामपंचायतीला लाजविणारा होत आहे, असा आरोप नाळा येथील ज्येष्ठ समाजसेवक चार्ली रोझारिओ यानी एका पत्रकान्वये केला असून लोकांना पुरेशा सेवा देण्याची विनंती त्यांनी केली आहे.
वसई विरार शहर मनपाच्या कारभारा विषयी कितीही आरडा ओरड केली तरी प्रशासनावर त्याचा काहिही परिणाम होताना दिसत नाही, असेच त्याच्या कारभारा वरून म्हणावे लागेल. खेदाची बाब म्हणजे वसई विरार मनपा कडून पश्चिम भागातील जनते कडून हजारो रूपये घरपट्टी वसूल करताना, त्या मोबदल्यात येथील जनतेस कुठल्याही सोयी सुविधा दिल्या जातात, याचा बारकाईने विचार केल्यास मनमानीपणे घरपट्टी वसूल केली जाते, असेच म्हणावे लागेल.
कारण पश्चिम भागात वसई विरार मनपाच्या मालकीच्या शाळा नसताना शैक्षणिक कर वसूल केला जात आहे. तर मोठे सर्व सुविधा असलेल हॉस्पिटल नाही. येथील भागात सर्वत्र पाणी पुरवठा केला जात नाही. सर्वत्र भुमिगत गटाराची सुविधा नाही. सुसज्ज रस्तेही नाहीत. जे रस्ते आहेत, त्या रस्त्यावर बेसुमार स्पिड ब्रेकर मुळे लोकांची हाडे खिळखिळी होताना दिसतात. इतकेच नाही तर पश्चिम पट्टयातील घरे ही पूर्वजांच्या जागेवर बांधण्यात आलेली असुन प्रत्येक कुटुंबाची स्वतंत्र घरे असताना गृहसंकुला प्रमाणे, मोठया निवासी जागेवर अनेक फ्लॅट व रहिवाशा सारखे गृहसंकुल नसताना मोठ्या निवासी जागेवरिल कर वसूल केला जातो. अशा या जाचक जिजीया करामुळे येथील स्थानिक जनता मेटाकुटीस आलेली आहे. तसेच नाळा भागात नियोजित विभागिय कार्यालया अभावी येथील जनतेस घरपट्टी व इतर महत्वाच्या कामासाठी गैरसोयीच्या ठिकाणी गास व वाघोली येथे जावे लागते. यामुळे गैरसोयी बरोबरच वेळ व आर्थिक भारही सहन करावा लागतो आहे. इतकेच नाही, तर परिवहन सेवा सुध्दा पुरेशा प्रमाणात दिली जात नाही. कारण नाळा, राजोडी ( सत्पाळा मार्गे ) मार्गावर पुरेशी बस सेवा नसल्यामुळे येथील जनतेची फारच गैरसोय होत आहे. यासाठी परिवहन विभागाकडे या मार्गावर बस फेर्या वाढविण्याची मागणी केली असता दुर्लक्ष केले जात आहे.