

ठाणे : सिद्धेश्वर तलावाच्या सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी एकीकडे कोट्यवधींचा खर्च ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत असताना तलावात होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात मात्र ठाणे महापालिका गंभीर नसल्याचे उघड झाले आहे. शहरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिद्धेश्वर तलावात हजारो माशांचा मृत्यू झाला आहे.
सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणामुळेच या माशांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आता लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे. या तलावात सांडपाणी सोडण्यात येत असून जलपर्णी देखील मोठ्या प्रमाणात असल्याने हा प्रकार घडला असून हा तलाव स्वच्छ करण्यासंदर्भात तक्रार देऊनही तलाव स्वच्छ का करण्यात आला नाही असा प्रश्न आता समोर आला आहे.
तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे. मात्र ही ओळख आता हळूहळू पुसू लागली आहे. शहरात जेमतेम ३० तलाव शिल्लक असून यातील काही तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिद्धेश्वर तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.24) रोजी उघड झाला आहे. सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून, सातत्याने तलावातील प्रदूषणात वाढ होत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी देखील सोडण्यात येते.तर ठिकठिकाणी जलपर्णी देखील साचली आहे. या तलावाची निगा राखण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र, त्याच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या संदर्भात महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्याने तक्रारी करूनही जलपर्णी काढली गेली नाही. त्यामुळे या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाला, असा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केला. यासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठवून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच तलावातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येते.त्याचप्रमाणे या ठिकाणी जलपर्णी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. तलावातील मेलेले मासे, आणि जलपर्णी हटवण्याचे काम तात्काळ सुरु करण्यात आले आहे. तलावात सांडपाणी कसे जाणार नाही याबाबत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ उपाय योजना करण्यात येणार आहे. " -
मनीषा प्रधान, मुख्य पर्यावरण अधिकारी, ठाणे महानगरपालिका, ठाणे
ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील तलावांच्या सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून देखील ठाणे महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. मात्र तलावाची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराकडून आणि ठाणे महापालिकेकडून तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा सर्व प्रकार घडला असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.