

ठाणे : ठाण्यातून जाणार्या वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्गासाठी एमएमआरडीएकडून ठाण्यात आठ पादचारी पुलांची निर्मिती करण्याचा निर्णय एमएमआरडीए कडून घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे अंदाजे 350 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या वतीने वर्तुळाकार मेट्रोच्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता एमएमआरडीएकडूनही पादचारी पुलांचे नियोजन करण्यात आले असल्याने ठाणेकरांचा मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचे चित्र आहे.
वडाळा ते कासारवडवली या मुख्य मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून ठाण्यातून जाणार्या मार्गाच्या कामालाही गती देण्यात आली आहे. विशेष करून मध्यरात्री नंतर मेट्रोची कामे जलदगतीने करण्यात येत येत्या दीड ते दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. मुख्य मेट्रो सुरु झाल्यानंतर ठाणे शहरातील अंतर्गत भागातून मेट्रोची स्थानके ही हायवेवर असल्याने मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोचण्यासाठी अंतर्गत मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुख्य मेट्रोच्या स्थानकातून बाहेर पाडण्यासाठी अथवा प्रवेश करण्यासाठी पादचारी पुलांची आवश्यकता असल्याने आता त्यादृष्टीने एमएमआरडीएकडून आठ पादचारी पुलांचे नियोजन करण्यात आले आहे.
या संदर्भातील आराखडा एमएमआरडीएकडून ठाणे महापालिकेला सादर करण्यात आला होता. त्यातील तीनहात नाका येथील पादचारी पुलाचा पिलर हा रस्त्यात येत असल्याचे पालिकेने त्यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यामुळे वाहतुक कोंडी होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर ठिकाणांचे देखील संयुक्त पाहणी दौरे देखील करण्यात आले होते. त्यातही काही ठिकाणी किरकोळ बदल करण्याचे सुचीत करण्यात येऊन आराखडा नव्याने सादर करण्यास सांगण्यात आला होता.
मागील आठवड्यात तो आराखडा पालिकेला सादर झाला असून त्याला मंजूरी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तर तीन हात नाका येथे रस्त्यावर येणारा पिलर आता सेवा रस्त्यावर उभारला जाणार आहे. दुसरीकडे आठपैकी ब्रम्हांड आणि गायमुख येथील पादचारी पुलाचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. उर्वरीत ठिकाणांची कामे देखील पुढील दोन ते तीन महिन्यात सुरु केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
विवियाना मॉल समोर मेट्रोचे स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मॉल मधून बाहेर पडल्यावर प्रवाशांना रस्त्यावर येऊन पुन्हा पुल चढण्याची गरज भासणार नाही. मॉल मधून थेट वरच्या वर मेट्रो स्टेशन गाठू शकणार आहेत. अशा पध्दतीने इतर ठिकाणी पादचारी पुलांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाण्यातील आठ स्टेशनच्या ठिकाणी म्हणजेच तिनहात नाका, कॅडबरी, माजिवडा, बाळकुम, ब्रम्हांड, आनंद नगर, कासारवडवली आणि गायमुख या ठिकाणी हे पादचारी पुल आणि स्कायवॉक असणार आहेत. या सर्वांचा खर्च सुमारे 350 कोटींच्या आसपास असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.