पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील सोसायट्यांना व इमारत बांधकाम परिसरात साठलेल्या पावसाचे पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या तयार झाल्याचे आढळून आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अशा १५ बांधकाम विकासकांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ज्या बांधकाम क्षेत्रांना आत्ता नोटीसा दिल्या आहेत, त्याठिकाणी पुन्हा डासाच्या अळ्या सापडल्यास ही बांधकाम क्षेत्रे बंद करण्यात येणार असल्याच्या सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत.
पावसाळा सुरू झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यू, लेप्टो यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभाग व किटकनाशक विभागाने मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील पाणी साचलेल्या ठिकाणाचे सर्वेक्षण केले असता डास उत्पत्ती स्थाने सापडलेल्या १५ बांधकाम विकासकांना व १० सोसायट्यांना महापालिकेच्यावतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या सर्व विकासकांना पावसाचे पाणी, दूषित पाणी साचणार नाही. त्यात डासांच्या आळ्या तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.