

डोंबिवली : शहापूर तालुक्याच्या कसाऱ्यात असलेल्या शिवाजीनगरमध्ये एका कुटुंबीयांवर २० ते २५ जणांच्या टोळक्याने अचानक लाकडी दांडके, लोखंडी सळ्या सळ्यांच्या साह्याने हल्ला केला होता. ही घटना दहा वर्षांपूर्वी घडली होती.
टोळक्याच्या हल्ल्यात कुटुंबीयांतील महिलांना हल्लेखोरांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार कसारा पोलिस ठाण्यात पीडित महिलेकडून दाखल करण्यात आली होती. या खटल्यात आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध करून देण्यास तपास यंत्रणा कमी पडल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मंगला मोते यांनी नऊ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
सुलोचना साधू जाखेरे (६३), विकास साधू जाखेरे (३६), प्रकाश यशवंत भारमल (५४), महेस नामदेव गिलांडे (३९), अशोक यशवंत भारमल (४७), दिनकर साधू जाखेरे (४२), सिताराम काशिनाथ कोरडे (६८), कैलास गोविंद मराडे (४३) आणि लिलाबाई यशवंत भारमल (८६) अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत. हा खटला न्यायालयात चालू असतानाच्या काळात साधू संतू जाखेरे यांचे निधन झाले होते.
जनाबाई जगन जगताप यांनी या हल्ल्याप्रकरणी कसारा पोलिस ठाण्यात सप्टेंबर २०१४ मध्ये तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली होती. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला मागील दहा वर्षापासून सुरू होता. तक्रारदार महिला जनाबाई जगताप यांनी पोलिस ठाण्यातील तक्रारीत म्हटले होते की, सप्टेंबर २०१४ मध्ये आपण कसाऱ्यातील शिवाजीनगर भागात घरी असताना अचानक गावातील २० ते २५ जणांनी आपल्या घरात घुसून कुटु्ंबीयांवर हल्ला चढविला. हल्लेखोरांकडे लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडके होते. या हल्ल्यात आम्ही घरातील आणि परिसरातील महिला जखमी झाल्या. हाणामारीच्या वेळी आपल्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली. याच दरम्यान राणी जगताप यांना दगडाने मारहाण करण्यात आली. या हल्लाप्रकरणामुळे कसारा परिसरात अनेक दिवस तणावाचे वातावरण होते.
कसारा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रमाणे हल्लेखोर आरोपींना अटक करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी कल्याण जिल्हा न्यायालयात हा खटला सुरू होता. न्यायालयाने या प्रकरणातील तपासात अनेक त्रृटी काढल्या. तीन साक्षीदारांच्या साक्षीत एकवाक्यता आढळून आली नाही. सोनसाखळी चोरीविषयीची साद्यंंत माहिती तक्रारदार देऊ शकल्या नाहीत. उलट तपासणीच्यावेळी तक्रारदार व साक्षीदार यांच्या माहितीत सातत्य आणि एकवाक्यता दिसून आली नाही. त्यामुळे सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाने नऊ आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.