

भिवंडी : संजय भोईर
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात विवाह सोहळे साजरे करण्यासाठी मोकळ्या मैदानात लग्न सोहळ्यासाठी खासगी मालकांकडून लग्नाचे हॉल बनवले गेलेले आहेत. परंतु त्यांच्याकडून कोणताही वाणिज्य कर पालिके कडे भरला जात नसल्याने पालिकेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
विशेष म्हणजे या लग्न हॉल चालकांकडून परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र ती सुद्धा घेतली जात नाही. शहरात अनेक विवाह हॉल मोकळ्या मैदानात खासगी जमीन मालकांनी थाटले आहेत. हे विवाह हॉल शहरातील नागरिकांना लग्न सोहळ्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी भाड्यापोटी पन्नास हजार ते एक लाख रुपये घेत आहेत. परंतु या जमिनीच्या वाणिज्य व्यावसायिक वापराचा कोणताही कर पालिकेच्या तिजोरीत भरला जात नाही.
या ठिकाणी होणारा कचरा पालिका उचलते, या परिसरात स्वच्छता पालिका राखते, पण या जमीन मालकांकडून कोणताही कर पालिका वसूल करीत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी जेवणावळी होत असताना येथे गॅस पेटवले जातात त्यातून आग लागण्याची व त्यातून परिसराची सुरक्षा वार्यावर असताना याकडे पालिका प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.
तत्कालीन आयुक्त अजय वैद्य यांनी या खासगी जमिनीवरील वाणिज्य वापरा संदर्भात कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्वेक्षणात 43 विवाह हॉल असल्याचे निष्पन्न झाले होते. पण नंतर हा निर्णय बासनात बंद झाला. जर या विवाह हॉलवर कर आकारणी झाली, तर पालिका तिजोरीत कोट्यवधी रुपये जमा होऊ शकतात. याबाबत पालिका प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.