मुंबई-ठाण्यापासून जवळ असलेल्या माळशेज घाटातील निसर्गरम्य सौंदर्य, धबधबे हे पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडत असतात. पर्यटक धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी तोबा गर्दी करतात. देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जगातील सर्वात मोठी विहंग गॅलरी माळशेज घाटात उभारण्याचा संकल्प राज्य सरकारने सोडला आहे.
वन विभागाच्या दहा हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणारा माळशेज घाट प्रकल्प हा वन विभागाच्या परवानगीसाठी लटकलेला होता. आता वन विभागाने परवानगी दिली असून लवकरच भूसंपादनास सुरुवात होईल, मी अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमक्ष जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने दिली. या प्रकल्पामुळे मुरबाडमध्ये मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन मुरबाड तालुक्याचा संपूर्ण कायापालट होऊन माळशेज घाट हा जागतिक पर्यटकांना एक पर्वणी ठरेल.
त्याकरिता सुमारे २७४ कोटी रुपये खर्चुन दहा हेक्टर वन जमिनीवर देशातील पहिला काचेचा स्कायवॉक, प्रेक्षक गॅलरी आणि साहसी खेळ, ॲम्पथिएटर उभारले जाणार आहे. या प्रकल्पावर राज्य सरकारसह वन विभागाने शिक्कामोर्तब केल्याने मुरबाडच्या कायापालट आणि रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण-नगर रस्त्यावर मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पश्चिम घाट म्हणून जागतिक वारसा यादीत हा परिसर आहे. उंच डोंगर, टेकडी तसेच विविध धबधब्यांनी नटलेला हा परिसर पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो. येथे दुर्मिळ पशू-पक्षी आढळून येतात. आतापर्यंत पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांची पसंती असते. पावसाळ्यातील दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर-दऱ्यांचा हा परिसर पर्यटकांना भुरळ पाडतो. म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाने प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत घाटात विविध ठिकाणी पार्किंग आणि खास प्रेक्षणीय स्थळे (पॉईंट) तयार केली आहेत. पर्यटकांची पसंती लक्षात घेऊन माळशेज घाट हा बारमाही पर्यटनासाठी विकसित व्हावा, या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्हा वार्षिक आराखड्यातून विविध सुविधा पुरविल्या आहेत.
या घाटाचे सौंदर्य, पर्यटकांचा ओढा पाहता माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन निवास शेजारील टेकडीवर जागतिक दर्जाचा स्कायवॉक बांधण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी मांडला. त्यानुसार घाटावर काचेचा पारदर्शक स्कायवॉक बांधणे व प्रेक्षक गॅलरीसाठी इमारत बांधणे, तसेच पर्यटकांच्या दृष्टीने सौंदर्याकरण, साहसी खेळ, ऍम्पिथिएटर, हॉटेल, मनोरंजन पार्क उभारण्याचा सविस्तर अहवाल तयार केला. तत्कालीन भाजपच्या सरकारकडे परवानगीसाठी लटकलेल्या स्कायवॉकच्या प्रस्तावास महाविकास आघाडीने मंजुरी दिली आणि १० कोटी खर्चुन माळशेज घाटाचा विकासाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला. या प्रकल्पासाठी २७४ कोटीं खर्च अपेक्षित असून त्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.