डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या नेवाळा नाक्यावरील हॉटेलमध्ये घुसून प्रतिस्पर्ध्यावर चार गोळ्या झाडून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या शूटर मिरचू शर्मा याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा खटला कल्याण न्यायालयात गेल्या 14 वर्षांपासून सुरू होता. निकाल देताना गोळीबारकांडात सहभागी असलेल्या दोघांची न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
नेवाळी नाक्यावरील साई हॉटेलमध्ये 9 सप्टेंबर 2010 रोजी जेवण करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या धर्मेंद्र बजाज याच्यावर त्याच्याच ओळखीचा असलेल्या मिरचू शर्मा याने त्याच्याकडील रिव्हॉल्वरमधून चार गोळ्या झाडल्या. एक गोळी बजाज याच्या डाव्या खांद्याला लागून दोन गोळ्या पोटात, तर एक गोळी कमरेखाली लागली होती. या गोळीबारात जबर जखमी झालेल्या धर्मेंद्रला प्रथम कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने पुढील उपचाराकरिता त्याला मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात मिरचू शर्मा, मनू शर्मा आणि दयाल मूलचंदानी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात प्रयोगशाळेचे अभिप्राय शूटर मिरचू शर्मा विरोधात गेले.
शूटर मिरचू शर्मा याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने प्रतिबंधकात्मक कारवाई म्हणून त्याला 2002 मध्ये तडीपार करण्यात आले होते. त्याच्या विरोधात ब्राऊन शूगर बाळगल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल होता. मात्र आपली माहिती बजाज यानेच पोलिसांना पुरवल्याचा मिरचूला संशय होता. मिरचू आणि बजाज या दोघांचा व्हीडिओ गेमिंगचा धंदा होता.
मिरचू आणि बजाज हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असल्याने बजाजला जेवण करण्याच्या बहाण्याने नेवाळी नाक्यावरील हॉटेलमध्ये बोलविले. त्याचवेळी एकाने बजाजला मागून पकडून ठेवले. मिरचू याने त्याच्याकडील रिव्हॉल्वरमधून बजाजवर चार गोळ्या झाडल्या. यात बजाज जायबंदी झाला. हा खटला कल्याण न्यायालयात 14 वर्षांपासून सुरू होता. या खटल्यात सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी काम पाहिले. या खटल्याचा निकाल देताना कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आरोपी मिरचू याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.