

डोंबिवली : डोंबिवलीचा नाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वेकडील फडके रोडवरच्या चौकात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची आरसी गाडी सोमवारी (दि.23) संध्याकाळी सहा वाजल्यापासून बंद अवस्थेत उभी आहे. इंजिन फेल झालेल्या कचऱ्याने भरलेली ही गाडी तब्बल १८ तास चौकात उभी असल्याने परिसरातील रहिवाशांसह पादचारी व दुकानदारांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
फडके रोडच्या दुतर्फा असलेल्या लहान-मोठ्या गृहसंकुलांव्यतिरिक्त दुकाने, खासगी दवाखाने, रूग्णालये देखिल आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यातून फडके रोडला खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा या फडके रोडवरील चौकात इंजिन फेल झालेल्या कचरावाहू आरसी गाडीने वाहतूकीची कोंडी केली होती. सकाळपासूनच रस्त्यावर वाहनांची गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील त्रस्त रहिवाशांनी या संदर्भात महापालिका प्रशासनाला अनेक वेळा फोन करून तक्रार केली. मात्र, दीर्घ वेळेपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने रहिवाशांसह पादचारी व दुकानदारांचा रोष वाढला आहे.
अखेर गणेश मंदिर संस्थेचे पदाधिकारी पुढे सरसावले आणि त्यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे थेट संपर्क साधून गाडी हटविण्याची मागणी केली. त्यानंतर दुपारी बारा वाजताच्या सुमारास महापालिकेच्या वाहन दुरुस्ती विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाडी दुरूस्तीचे काम सुरू केले. त्यानंतर ही गाडी पुन्हा सेवेसाठी रवाना करण्यात आली.
दुरूस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरसी गाडीच्या इंजिनमधील मुख्य पार्ट खराब झाल्याने ती बंद पडली होती. पार्टचे बदलण्याचे काम केल्यानंतर तासाभरात गाडी दुरुस्त होऊन ती चौकातून हलविण्यात आली.
दरम्यान, या प्रकारामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दिरंगाईवर रहिवाशांसह पादचारी व दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कचरा उचलणाऱ्या गाड्यांची वेळेत देखभाल-दुरूस्तीची व्यवस्था न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते, याकडेही स्थानिकांनी लक्ष वेधले आहे. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीच्या प्रतिसाद यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणीही करण्यात येत आहे.