

कल्याण (ठाणे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य कल्याण येथे उभारण्यात आलेल्या ज्ञान केंद्रांच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत आहेत. अशी ज्ञान केंद्रे संपूर्ण राज्यात उभारली जातील, अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी कल्याण येथे केली.
कल्याण पूर्वेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रविवारी (दि.13) रोजी कल्याण पूर्वेतील 'ड' प्रभाग समिती कार्यालयाच्या आवारात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात देशातील आगळ्यावेगळ्या ज्ञान केंद्राचे लोकार्पण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट होलोग्राफी, विविध माहितीपटाच्या माध्यमातून येथे उलगडण्यात आला आहे. शेकडो पुस्तकांचे ग्रंथालयही यात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांचे साहित्य, त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी आता कल्याणकरांना मिळणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 13 एप्रिल रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अपरिहार्य कारणामुळे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.
यावेळी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाचा प्रवास उलगडून सांगितला. स्थानिकांची मागणी होती त्यानुसार हे स्मारक उभे राहिले. यात संघर्ष समितीपासून अनेकांचे योगदान आहे, असे यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. परस्पर संवादी (इंटरॅक्टिव) पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा कळावी हे ज्ञान केंद्र उभारण्या मागचा मुख्य हेतू होता. या केंद्रात एक ते दीड तासात आगळावेगळा अनुभव मिळेल. या स्मारकासाठी प्रयत्न करणार्या आणि पाठबळ देणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही डॉ. शिंदे यांनी आभार मानले.
नागरिकांच्या मागणीनुसार आणि वेगळ्या संकल्पना अंमलात आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे, असे गौरवोद्गार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी यावेळी काढले. या दिमाखदार सोहळ्यात शेकडोच्या संख्येने भीम बांधव उपस्थित होते. तसेच याप्रसंगी कल्याण पुर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे आण्णा रोकडे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनल गोयल, शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.