

डोंबिवली : लोहमार्ग पोलिस मंगळवारी (दि.4) आपल्या हद्दीत गस्त घालत होते. त्यांना एक वजनदार बॅग आढळून आली. पोलिसांना या पिशवीत एक लॅपटाॅप आढळून आला. ही बॅग लॅपटाॅपसह लोहमार्ग पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. या बॅग आणि लॅपटाॅपच्या माध्यमातून पोलिसांनी संबंधितांना शोध घेतला. त्यावेळी हा लॅपटाॅप कल्याणमधील एका तरूणीचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे या तरूणीचा शोध घेऊन तिला तिचा लॅपटाॅप परत केला.
मिताली लोहार असे या तरूणीचे नाव आहे. रेल्वे पोलीस ठाण्यातील वाढत्या मोबाईल चोऱ्यांचा विचार करून रेल्वे स्थानकांंवरील पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. कर्जत लोहमार्ग पोलिस ठाण्यातील हवालदार कांबळे आणि महिला हवालदार शिंदे हे त्यांच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गृहरक्षक वाघ यांनी त्यांना बेवारस पध्दतीने आढळून आलेली बॅग गस्तीवरील हवालदार शिंदे आणि कांबळे यांच्याकडे आणून दिली. ही बॅग संशयास्पद वाटत असल्याने पंचांसमक्ष उघडली. या बॅगेत लॅपटाॅप आढळून आला.
ही बॅग आणि त्यामधील लॅपटाॅप कुणाचा याची कोणतीही माहिती समजून येत नव्हती. त्यामुळे ही बॅग कुणाची असावी ? असा प्रश्न पोलिसांसमोर पडला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. हा तपास करत असताना पोलिसांना लॅपटाॅपसह बॅग कल्याणमधील एका तरूणीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या तरूणीशी संपर्क साधून तिला तिचा लॅपटाॅप परत केला. हरवलेला लॅपटाॅप परत मिळाल्याने तरूणीने समाधान व्यक्त केले. अलीकडे रेल्वे स्थानकात होणाऱ्या चोऱ्यांमधील मुद्देमाल प्रवाशांना चोर पकडल्यानंतर परत करण्यात येत आहे. याबद्दल प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.