Thane News | पालिकेचे कळवा रुग्णालय ठरतेय नवजात बालकांसाठी मृत्यूचे द्वार

तीन महिन्यात 49 बालके दगावली; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर
ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (कळवा रुग्णालय)
ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (कळवा रुग्णालय)file photo
Published on
Updated on
ठाणे : प्रवीण सोनावणे

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (कळवा रुग्णालय) नवजात बालकांसाठी मृत्यूचे द्वार ठरत आहे. गेल्या तीन महिन्यात या रुग्णालयात 49 नवजात बालके दगावली असल्याची धक्काय्यदक माहिती समोर आली आहे. दगावलेली सर्व नवजात बालके ही एनआयसीयुमधील असून विशेष म्हणजे यामध्ये अडीच किलोच्या वर वजनाच्याही काही नवजात बालकांचा देखील समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवजात बालकांचा डेथ रेट हा सरासरी 7 टक्के असायला हवा. तोच डेथरेट 23 टक्यांच्या वर असून गेल्या चार वर्षात हा डेथरेट 20 टक्क्यांच्या खाली आलेला नाही.

Summary
  • 2.5 किलो पेक्षा जास्त वजन असलेल्या बालकांचाही मृत्यू

  • महिन्याला बालकांच्या मृत्यूचे सरासरी प्रमाण 20 बालके

  • बालकांच्या मृत्यूचा डेथ रेट 23 टक्के

  • गेल्या चार वर्षांपासून डेथ रेट 20 टक्क्यांच्या वरच

  • मागील वर्षी फेब्रुवारी ते डिसेंबर कालावधीत मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 889

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी एकाच दिवसांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण राज्यात या घटनेचे पडसाद उमटले होते. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लावण्याचे आदेश दिले होते. त्या चौकशी समितीने काय निष्कर्ष काढला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र या रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. गेल्या तीन महिन्यात तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाला असून ही सर्व बालके एनआयसीयुमधील आहेत.

गेल्या वर्षी फेब्रुवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत जवळपास 889 बालके दगावली आहेत. ही बालके अत्यावस्थेत असताना बाहेरून रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात किंवा अत्यंत कमी वजन असल्याने मुलांचे मृत्यू होत असल्याची कारणे रुग्णालय प्रशासनाकडून दिली जात आहेत.

एनआयसीयुमध्ये तीन महिन्यातील मृत्यू झालेल्या बालकांची संख्या...

  • जून 21

  • जुलै 21

  • ऑगस्ट 7

  • एकूण 49

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून नवजात बालकांना हाताळले जात असल्याचा आरोप

कळवा रुग्णालयात महिन्याला 590 पेक्षा अधिक प्रसूती होतात. या ठिकाणी एक बालरोग तज्ञ असून त्यांच्यावरच उपवैद्यकीय अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बालरोग तज्ञांनी ओपीडीला बसने किंवा वॉर्डमध्ये राउंड मारणे बांधकारक असताना या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात असून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून नवजात बालकांना हाताळले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. नव्या जगात येऊन जग पाहण्याआधीच नवजात बालकांचा अशाप्रकारे मृत्यू होत असल्याने हा सर्वच प्रकार मूल गमावलेल्या मातांसाठी धक्कादायक आहे.

मात्र हे मृत्यू कमी करण्याचे कोणतेच प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. कळवा रुग्णालयात ठाणे शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उपचारासाठी रुग्ण येत असतात. यात प्रसूती मातांचाही मोठया प्रमाणात समावेश आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने पालिकेचे हेच कळवा रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार आहे. मात्र या रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी अक्षरश: खेळ केला जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. त्यात आता नवजात बालकांचे होत असलेल्या मृत्यूंना जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने प्रकर्षाने समोर आला आहे. गेल्या तीन महिन्यांत नवजात बालकांचे झालेल्या मृत्यूंची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता या संदर्भात ठाणे महापालिका प्रशासन काय भूमीका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एनआयसीयुमध्ये कोणत्या बालकांना दाखल केले जाते...

  • अत्यंत कमी किंवा 1 किलो पेक्षा कमी वजनाची बालके

  • जे बाळ जन्मतः रडत नाही अशी बालके

  • नवजात संसर्ग झालेली बालके

  • बाहेरून आलेले नवजात अतिजोखमीचे बालके

एनआयसीयुमध्ये निर्जंतुकीकरण नाहीच

एनआयसीयुमध्ये महिन्यातून दोन वेळा हे वॉर्ड निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. मात्र कळवा रुग्णालयात निर्जंतुकीकरणच केले जात नाही. निर्जंतुकीकरण करताना बालकांना दुसर्‍या वॉर्डमध्ये हलवले जाते मात्र पर्यायी वॉर्ड नसल्याने हे निर्जंतुकीकरण होत नसल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news