Thane News | समुद्राच्या उधाणाने मच्छीमारांचे मोठे नुकसान

Bhayander Fishing : उत्तन किनार्‍यावर लाटांच्या तडाख्यात मासेमारी साहित्य गेले वाहून
Thane News | समुद्राच्या उधाणाने मच्छीमारांचे मोठे नुकसान

भाईंदर : गेल्या तीन दिवसांपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे लोकांची त्रेधातिरपीट उडाली असताना सोमवारी (दि.२२) रोजी समुद्रात उधाणाच्या भरतीने उसळलेल्या लाटांच्या तडाख्यात उत्तनमधील मच्छीमारांच्या मासेमारी साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.

मिरा-भाईंदर शहराला सुमारे 5 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभल्याने किनार्‍यावर मोठ्याप्रमाणात मच्छीमार वास्तव्य करतात. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असला तरी त्यांना समुद्रातील संकटाशी दोन हात करून मासेमारी करावी लागते. त्यातच 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंदी असल्याने तत्पूर्वी केलेल्या मासेमारीत गवसलेली बोंबील, मांदेली, कोळंबी, जवळा, वागट्या आदी मासळी सुकवून ते मासेमारी बंदीतील पावसाळी हंगामात बाजारात विकल्या जातात. या मासळींपैकी कोळंबी, जवळा, करंदी, मांदेली आदी मासळी समुद्र किनार्‍यावर बंधारा तसेच काँक्रीटीकरण (खळ) केलेल्या ठिकाणी सुकविल्या जातात. तर वागट्या, बोंबील आदी मासळी सुकविण्यासाठी बांबूच्या वलांडी किनार्‍यावर बांधल्या जातात. तर मासेमारी बंदी कालावधीत बोटींसह मासळी पकडण्याची जाळी (डोलनेट) व वलांडी किनार्‍यावर शाकारून तसेच बांधून ठेवल्या जातात. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे समुद्रात वादळी वार्‍यासह पावसाचाही जोर वाढला होता. आणि सोमवारी (दि.२२) रोजी त्याचा जोर आणखी वाढून समुद्राला उधाण आले होते. यामुळे समुद्राच्या लाटा सुमारे 4 ते 5 मीटर उंच उसळून त्या कोळीवाड्यांतील घरांजवळ तसेच किनार्‍यावर धडकत होत्या.

Thane News | समुद्राच्या उधाणाने मच्छीमारांचे मोठे नुकसान
Thane | पर्सेसिन नेट, एलईडी मासेमारी मत्स्य विभागाच्या रडारवर

मासळी पकडण्याची सुमारे 70 फूट लांब व सुमारे 30 फूट रुंद जाळीसाठी किमान 1 लाख रुपये खर्च येतो. मात्र या जाळी एकाच आकारमानात मिळत नसून त्या तुकड्यात उपलब्ध होतात. त्या एकत्र विणण्यासाठी किमान 10 दिवस लागतात. यामुळे ज्यांची डोलनेट समुद्रात वाहून गेली आहे. त्यांना ऑगस्टपासून सुरु होणार्‍या मासेमारीला ऐन हंगामात काही दिवस मुकावे लागणार आहे. तसेच मासळी सुकविण्याच्या वलांडी देखील समुद्रात वाहून गेल्याने त्यांचे सुद्धा आर्थिक नुकसान झाल्याने राज्य शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी.

शर्मिला गंडोळी, माजी नगरसेविका

मासेमारी हंगामात मासळी पकडण्याचा प्रश्न ऐरणीवर

या लाटांच्या तडाख्यात मच्छीमारांनी किनार्‍यावर बांधून ठेवलेल्या डोलनेट व बांबूच्या वलांडी समुद्रात वाहून गेल्या. यातील काहींच्या वलांडी तसेच डोलनेट किनार्‍यावर उपस्थित असलेल्या मच्छीमारांनी त्वरीत पकडल्याने त्या हाती लागल्या. तर इतरांच्या वलांडी व डोलनेट समुद्रात वाहून गेल्याने त्यांचे चांगलेच आर्थिक नुकसान झाले आहे. येत्या 10 दिवसांत 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार असल्याने ज्या मच्छीमारांच्या डोलनेट समुद्रात वाहून गेल्या आहेत, त्यांच्या समोर ऐन मासेमारी हंगामात मासळी पकडण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news