

डोंबिवली : युवा पिढीला बरबादीच्या मार्गावर ओढणाऱ्या बदमाशांचे रॅकेट पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेतील भानूनगर परिसरात असलेल्या सोसायटीच्या तळमजल्यावरील गाळ्यांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 6 लाख 68 हजार रूपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुटख्याची विक्री करणाऱ्या तीन जणांवर महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गाळ्यांमध्ये प्रतिबंधित गुटख्याची साठवण आणि तेथूनच वितरण करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकासह महात्मा फुले चौक पोलिसांनी मंगळवारी अचानक छापा टाकला. छाप्या दरम्यान राजनिवास सुगंधित पान मसाला, राजश्री पान मसाला, कॅश गोल्ड मसाला, बाजीराव गोल्ड मसाला, जेड एल, डबल ब्लॅक, व्हीसी, मस्तानी या प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटख्याची पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत 6 लाख 68 हजार रूपये आहे.
महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न व सुरक्षा कायद्याने गुटखा, पानमसाला, सुंगंधी तंबाखू यांची निर्मिती, साठवण, वाहतूक आणि विक्रीला प्रतिबंध केला आहे. विक्रेत्यांनी सुगंधीत तंबाखु आणि पानमसाला विक्रीसाठी साठवण केल्याप्रकरणी सरकारतर्फे मानपाडा पोलिस ठाण्याचे हवालदार बालाजी गरूड यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुटखा माफिया जहांगीर शेख, जिशान खान आणि मुनावर खान या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कल्याणमध्ये बेकायदा गुटख्याचा चोरी-छुपे व्यापार करणाऱ्या बदमाशांच्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या वस्तीमध्ये हे रॅकेट सुरू होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. मात्र कल्याण-डाेंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गुटख्यासह गांजा, चरसची देखिल खुलेआम विक्री केली जात आहे. बेकायदा चालणाऱ्या धंद्यांना अभय मिळत असल्यामुळे परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.