

ठाणे : मुंबई महानगरपालिकेतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या पाच ठेकेदार कंपन्यांना ठाणे महापालिकेमध्ये कोणतेही काम देऊ नये, अशी स्पष्ट मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिकेच्या नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई पालिकेतील ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईडी चौकशी सध्या सुरू असून, या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच ठेकेदार कंपन्यांमध्ये अँक्यूट डिझाईनिंग, कैलास कन्स्ट्रक्शन, एन.ए. कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जे.आर.एस. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, या गैरव्यवहारात फक्त कंत्राटदार नव्हे, तर तीन पालिका अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांनी गाळ उपसण्याच्या कामांमध्ये बनावट मोजमापे, खोटे दस्तावेज आणि चुकीचे बिलिंग यांसारख्या गंभीर त्रुटी केल्या असून, संबंधित प्रकरण सध्या तपासा अंतर्गत आहे.
दरम्यान या कंपन्यांनी मुंबईत जे प्रकार केले तेच प्रकार ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्येही करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कंपन्यांची ठाणे महापालिकेत देखील कोट्यवधींची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कररूपात मिळणाऱ्या निधीचा अपव्यय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कंपन्यांची कार्यपद्धती व कामांची गुणवत्ता तपासणे, आणि त्यांनी केलेल्या सर्व प्रकल्पांचे पुनरावलोकन करणे अत्यावश्यक आहे.
“या कंपन्यांना पुन्हा काम देणे म्हणजे जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी होईल. त्यांच्या कामावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून त्यांचा काळाबाजार रोखावा,”
संदीप पाचंगे, सरचिटणीस, मनविसे, ठाणे
निवेदनाद्वारे त्यांनी या पाचही कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे, कोणतेही नवीन ठेके दिले जाऊ नयेत, दिलेल्या सर्व कामांचे पुनरावलोकन व तपासणी करावी, कामाचा दर्जा आणि खर्चाचे बिल पडताळावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.