Thane News | कल्याण-डोंबिवलीत ऑनलाईन लॉटरीचा शिरकाव

Lottery Mafia: बेकायदा अ‍ॅपद्वारे लॉटरी माफियांकडून खेळणार्‍यांची फसवणूक; कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडीत
Lottery Mafia
बेकायदा अ‍ॅपद्वारे लॉटरी माफियांकडून खेळणार्‍यांची फसवणूकfile photo
Published on
Updated on

डोंबिवली : सुशिक्षितांच्या सांस्कृतिक डोंबिवलीसह ऐतिहासिक नगरीची ओळख असलेल्या कल्याणात सद्या ऑनलाईन लॉटरीचा शिरकाव झाला आहे. काही लॉटरी माफियांनी स्वतःचा अ‍ॅप तयार करून ऑनलाईनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लॉटरीचा गोरख धंदा सुरू केला आहे. या बदमाशांकडून एकीकडे सरकारचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवला जात आहे. तर दुसरीकडे लॉटरीच्या माध्यमातून केवळ माफियांनाच फायदा होत असल्याने लॉटरी खेळणारी अनेक कुटुंब देशोधडीला लागत चालली आहेत. याकडे गंभीर समस्येकडे स्थानिक पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाया कराव्यात, अशी मागणी पुढे आली आहे.

नशील्या पदार्थांच्या विळख्यातून तरूणाईला मुक्त करण्याचा विडा उचललेल्या महाराष्ट्राचे बुलडोझरमॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डान्स बार, हुक्का पार्लर, पान-बिड्यांचे स्टॉल्स आणि ढाब्यांवर कठोर कारवाईचे फर्मान सोडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासनाने पोलिसांच्या मदतीने नशील्या पदार्थांचे अड्डे उध्वस्त करून टाकले आहेत. तथापी लॉटरी जुगाराच्या आहारी गेलेल्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे कल्याण-डोंबिवलीत पसरत चाललेल्या ऑनलाईन लॉटरीच्या गोरख धंद्यांतून दिसून येते.

रेल्वे स्थानक परिसरातील कल्याणच्या पश्चिमेकडे, तर डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिम परिसरात ऑनलाईन लॉटरीची दुकाने थाटण्यात आली आहेत. राज्य शासनाचा कोणताही कर न भरता बेकायदेशीरित्या ऑनलाईन लॉटरी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. आतातर लॉटरी माफियांनी स्वतःचा अ‍ॅप तयार करून त्याद्वारे ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आहे. शासनाचे त्यामुळे कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. ऑनलाईन सेंटरची पोलिस यंत्रणेसह शासनाच्या संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांतही लॉटरीची नशा

ऑनलाईन लॉटरीच्या नादाला लागलेली अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत चालली आहेत. ऑनलाईन लॉटरीची नशा चढलेले शाळा-कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यात गुरफटत चालले आहेत. लॉटरी जुगाराच्या व्यसनामुळे वाममार्गाने पैसा कमवण्याकडे कल वाढला आहे. यात खेळणार्‍याऐवजी लॉटरी माफियांनाच सर्वाधिक लाभ होत असल्याचे जागरूक नागरिकांकडून सांगण्यात आले. या गंभीर समस्येकडे स्थानिक पोलिस प्रशासनाने तातडीने पावले उचलून बेकायदेशीरपणे नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन सेंटर्सवर कारवाया कराव्यात, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news