.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मराठा आरक्षणावरून राज्यात आंदोलने पेटली असताना राज्य सरकारतर्फे मराठा विद्यार्थी - विद्यार्थिनीसाठी विविध सुविधा देण्याच्या घोषणा करीत मराठा समाजाला न्याय देण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यापैकी एक घोषणा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थी - विद्यार्थीनींसाठी वसतिगृह उभारणे होय. दुर्दैवाने गेल्या सहा वर्षात तीन मुख्यमंत्री होऊनही मराठा वसतिगृह अर्थात डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह उभारण्याची घोषणा पूर्ण होऊ शकलेली नाही. (Maratha Reservation) काही उद्घाटनापुरते वसतिगृह सुरू झाले आणि काही दिवसांत बंदही झाले. त्यामुळे सरकारने तोंडाला पाने पुसल्याची भावना मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
राज्यातील मराठा समाजाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि अन्य मागण्यांसाठी 58 विक्रमी मराठा क्रांती मूक मोर्चे काढले. मुंबईतील 9 ऑगस्ट 2017 मध्ये निघालेल्या महामोर्चानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचे आश्वासन दिले होते. जमीन आणि निधीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात मराठा वसतिगृहे सुरू होऊ शकली नाहीत.
याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने 2018 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना यांचे जी.आर. काढले. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत मजूर आहेत. त्यांना 30 हजार आणि आठ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये वसतिगृह निर्वाह भत्ता निर्धारित केला. या योजना राज्यातील सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना लागू करण्यात आल्या आहेत. यावरून मराठा समाजात नाराजी निर्माण झाली असताना महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2021 मध्ये ठाण्यात मुलींसाठी पहिले वसतिगृह सुरू केले.
राज्य सरकारने मराठा वसतिगृह सुरू करण्यासाठी 5 कोटींचा निधी आणि 1 एकर जागा देण्याचे आश्वासन मराठा क्रांती मोर्चाला दिले होते. ती जागा कुठे गेली, त्या निधीचे काय झाले? मराठा होस्टेलचे मारेकरी कोण आहेत? सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारमध्ये हिंमत असेल तर कै. आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे ऑडिट करावे. महामंडळात भयाण असे चित्र आहे.
वीरेंद्र पवार, मराठा राज्य समन्वयक