

ठाणे : घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथे म्हाडाच्या जागेत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या मठाची मान्यता दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख चंद्रकांत मोरे (गुरुमाऊली) यांनी रद्द केली आहे. त्यामुळे दिंडोरी येथील सेवा मार्गाच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आज मठात येऊन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची प्रतिमा ताब्यात घेतली आणि दिंडोरी प्रणित मठ असे असलेला नामफलक हटविण्यात आला.
स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने स्थापन केलेले मठ.तोडण्याची कारवाई ठाणे महापालिकेने केली होती. त्यावेळी भक्तांसह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, ठाकरे शिवसेनेने महापालिकेबाहेर आंदोलन करून कारवाई थांबविली होती. त्यानंतर शेजारी असलेल्या दुसऱ्याने मठाच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने बांधून देण्यात आलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले. मात्र दिंडोरी प्रणित मठाच्या पदाधिकार्यांनी जागा खाली करून मठ हलविला नाही. अखेर आज मठाची मान्यता रद्द करून गुरुमाऊली मोरे यांची प्रतिमा काढून घेण्यात आली. तसेच नावाचे फलक ही काढण्यात आले. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.
या मठात घोडबंदर रोडबाहेरील काही जण विश्वस्त होते. या मठामध्ये गोडाऊन उभारण्यात आले असून, गायी आणण्यात आल्या होत्या. तसेच दररोज जेवण बनविले जात होते. त्याचा शेजारच्या सोसायटीतील नागरिकांना त्रास होत होता. या रहिवाशांच्या वतीने शिवसेना विभागप्रमुख रवि घरत यांनी पुढाकार घेतला होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हाडाच्या आरक्षित जागेऐवजी अन्य ठिकाणी मठ उभारण्यास मदत केली.
या संदर्भात दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख चंद्रकांत मोरे (गुरुमाऊली) यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार आनंदनगर येथील मठाबाबत चौकशी करून मान्यता रद्द करण्यात आली. त्यानुसार दिंडोरी येथील सेवा मार्गाच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आज मठात येऊन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची प्रतिमा ताब्यात घेतली. तसेच दिंडोरी प्रणित मठ असे असलेला नामफलक हटविण्यात आला.
गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची मठासाठी आचारसंहिता व नियमावली निश्चित केली आहे. त्यानुसार देशभरात स्वामी समर्थ मठ चालविले जातात. मात्र, आनंदनगर येथील केंद्रात आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत होते. दिंडोरीहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन सूचनाही दिल्या होत्या. परंतु, आचारसंहितेचे पालन न झाल्यामुळे केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली, असे दिंडोरी प्रणित केंद्राच्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी योगिता पाटील व ज्येष्ठ स्वामीभक्त सुरेंद्र यंदे यांनी सांगितले.