

शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढून ठाण्यातील नागरिकांना अधिकृत आणि हक्काचा निवारा देण्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या क्लस्टर योजनेसाठी कर्ज काढावे लागणार आहे. किसनगर क्लस्टरसाठी अंमलबजावणी प्राधिकरण असलेल्या महाप्रीत संस्थेच्या वतीने 2,546 कोटींच्या कर्जासाठी हुडकोकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र यासाठी ठाणे महापालिकेला आपली मालकीची जमीन हुडकोकडे गहाण ठेवावी लागणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे.
ठाण्यातील क्लस्टर योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. संपूर्ण ठाणे शहरात क्लस्टर योजनेचे 44 युआरपी तयार करण्यात आले असून यामध्ये केवळ मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात येत असलेल्या नागरी पुनरुत्थान आराखडा क्र.12 (किसननगर) या योजनेला गती देण्यात आली आहे. या आराखड्यचे काम देखील सुरु करण्यात आले असून यासाठी महाप्रीत या संस्थेला अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महाप्रीत संस्थेला उद्देश पत्र (एल.ओ.आय) नुसार अंमलबजावणी कामी हुडको कडून महाप्रीतला प्राप्त होणार्या कर्जासंदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या मालकीची जमीन गहाण ठेवण्याकरीता नाहरकत दाखला देण्याबाबत ठाणे महापालिकेच्या वतीने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
एकूण क्लस्टरची संख्या 8
अर्बन रिन्युवल प्लॅन 43
क्लस्टरच्या योजनेच्या लाभार्थीची संख्या 13. 8 लाख
क्लस्टरच्या माध्यमातून होणार विकास 1477.18 हेक्टर
पहिल्या टप्प्यातील विकास 23 टक्के
सीआरझेड क्षेत्र 123. 36 हेक्टर
वनविभागाच्या अंतर्गत येणारे क्षेत्र 20.58 हेक्टर
ठाणे शहराची लोकसंख्या 2011 नुसार 18 लाख
2041 साली भविष्यातील अंदाजे लोकसंख्या 32
ठाणे येथील एमआयडीच्या एकुण जमीनीपैकी 50 टक्के जमीन म्हणजेच 22,317.60 चौ.मी. इतके क्षेत्र करारनामा करून ठाणे महानगरपालिकेच्या नावे करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार शासनाच्या निर्णयाप्रमाणे कृषी विभागाची 1.932 हेक्टर इतकी जमीन ठाणे महानगरपालिकेच्या नावे करण्यास मंजूरी प्रदान करण्यात आली असून सदरची जमीन सद्यस्थितीत ठाणे मनपा च्या नावे झालेली आहे. महाप्रीतला एप्रिल 2024 रोजी ठाणे महानगरपालिकेने उद्देशपत्र (एल ओ आय ) अदा केलेले आहे.
किसनगर क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाप्रीतने हुडकोकडून 2,546 कोटीचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज सादर केले असून यांदर्भात ठाणे महापालिकेला पत्राद्वारे कळवण्यातही आले आहे. हे कर्ज मिळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या मालकीची यु.आर.सी. क्र. 5 व 6 मधील 19,320.तसेच 22,317.60 अशी एकूण 41,637.60 चौ.मी. इतकी जमीन त्याचसोबत जमिनीवर भविष्यात बांधिव स्वरुपात निर्माण होणारी मालमत्ता हुडकोकडे गहाण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे महाप्रीतच्या पत्रामध्ये नमुद आहे. जमीन गहाण ठेवण्यासाठी संबंधीत जमीनमालक या नात्याने ठाणे महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करुन, त्याप्रमाणे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाप्रीत या संस्थेने ठाणे मनपाकडे पत्रव्यवहार केला आहे.