ठाणे : पिसे धरणांतुन आलेल्या पाण्यावर फिल्ट्रेशन प्रक्रीया करुन ठाणे शहराला दिले जाणारे पाणी अतिशय दूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु पिसे धरणांतुन येणारे पाण्यांमध्ये आजुबाजूला असणारे वासिंद शहरातील जिंदाल कंपनीतील दुषीत पाणी तसेच संपुर्ण शहराचे ड्रेनेजचे पाणी तसेच खडवली, भादाणे, आतकोली, आरंजोनोली या सर्व गावांतील जनावरांचे मलमूत्र, शेण तसेच अर्धवट जळालेले मृतदेह, इतर सर्व घाणी मिसळलेले असते व असे मलमुत्र मिश्रीत (ड्रेनेज) पाणी पंपींग स्टेशनला पुरविले जात असल्याचे समोर आले आहे. त्याच पाण्यावर फिल्ट्रेशन प्रक्रिया करुन सदर पाणी पिण्यासाठी ठाणे शहराला पुरविले जात असल्याचे वास्तव ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक हिरालाल भोईर यांनी समोर आणले आहे. ग्रामस्थ्यांशी चर्चा करून तसेच प्रत्यक्षात जागेवर पाहणी करून त्यांनी ही माहिती समोर आणली असल्याचा दावा भोईर यांनी केला आहे.
ठाणे महानगरपालिकेतर्फे वरील सर्व पाणी पुरवठा योजनेसाठी भरमसाठ पैशांची तरतुद करुन ठेवलेली असताना सुध्दा प्रत्यक्षात वास्तव खुप भयानक व नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याचे माजी नगरसेवक हिरालाल भोईर यांनी समोर आणले आहे.
ठाणे महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणार्या मुख्य घरणांपैकी भातसा धरण (शहापुर), पिसे धरण हे आहेत. यापैकी भातसा धरणातुन नदीद्वारे खुल्या स्वरुपात पाणी पुरवठा पिसे धरणात सोडला जातो व तिथुन सदरचा पाणी पुरवठा पंपींग स्टेशन टेंमघर येथे केला जातो. पिसे धरणापासुन पंपींग स्टेशनपर्यंत साधारण 3 ते 4 किलोमीटर एवढे अंतर आहे. भोईर यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात सदर ठिकाणी भेटी देवून, गावांतील गावकर्यांशी चर्चा केली असता, भातसा धरण ते पिसे धरणापर्यंत अंदाजे 40 किलोमीटर एवढे अंतर असून भातसा धरणातुन होणारा पाणी पुरवठा हा नदीद्वारे खुल्या स्वरुपात होत असल्याने आजु-बाजूच्या गावातील सांडपाणी व मलमुत्र हे सहजरित्या पाण्यामध्ये मिसळले जाते
ठाणे महानगरपालिकेचा सन 2023-24 चा वार्षीक अर्थसंकल्प 4370 कोटी मंजूर झालेला आहे. त्यानुसार अमृत योजना-2 पाणी पुरवठा योजना जाहीर करण्यात आली. सदर योजनेनुसार पाणी पुरवठा विस्तारी करणासाठी एकुण 323 कोटी 72 लक्ष इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानुसार एकुण रकमेपैकी 500 कोटी रक्कम महापालिकेतर्फे खर्च केली जाणार आहे. या अंतर्गत विविध उपक्रमाद्वारे लाखो कुटूंबांना सदर योजनेचा लाभ देण्याचे योजले आहे. मुख्यमंत्री ठाणेकर असताना देखील ठाणेकर नागरीकांना मलमुत्र मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. भातसा धरणातुन पाईपलाईनद्वारे थेट पंपींग स्टेशनपर्यंत पाणी पुरवठा करणे शक्य असतानाही तसेच मुख्यमंत्री स्वतः ठाण्याचे प्रतिनिधीत्व करत असतानाही व ठाणे महानगरपालिकेवर मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असताना देखील ठाणे महानगरपालिका आजही दुषीत पाणी पुरवठा ठाणे शहराला होत असल्याबद्दल भोईर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.