Thane News | गणपतींच्या आगमनापूर्वी खड्ड्यांचे विघ्न दूर करा; गणेश मंडळांची मागणी

गणेश मंडळांची ठाणे महापालिकेकडे मागणी
ठाणे महापालिका
ठाणे महापालिकाfile photo
Published on
Updated on

ठाणे : गणपतीच्या आगमनापूर्वी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे विघ्न दूर करा, अशी मागणी ठाण्यातील गणेश मंडळांनी ठाणे महापालिकेकडे केली आहे. गणेशोत्सवासाठी लागणार्‍या परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच, मुंब्रा आणि रेतीबंदरमध्ये आणखी एका विसर्जन घाटाची निर्मिती, मोठ्या श्रींच्या मूर्तींसाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करून देणे अशा अनेक मागण्या गणेश मंडळांकडून ठाणे महापालिकेकडे करण्यात आल्या.

पुढच्या महिन्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून उत्सवाच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी ठाणे महापालिकेने गणेश मंडळांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि पोलीस अधिकारी तसेच, महावितरण, वाहतूक आणि टोरोंटचे अधिकारी देखील उपस्थित होते.

या बैठकीमध्ये वाहतुकीला, पादचार्‍यांना अडथळा निर्माण होणार नाही. त्यादृष्टीने सर्व मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या बैठकीत केले. त्याचसोबत, वीज जोडणी आणि अग्निसुरक्षा यांच्याबाबत उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी व मुख्य अग्निशमन अधिकारी गिरिश झळके यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. पोलीस विभाग आणि महावितरण व टोरंटच्या अधिकार्‍यांनीही त्यांच्या गणेशोत्सव मंडळांकडून असलेल्या अपेक्षा विशद केल्या.

ऑनलाइन परवानगीला सुरुवात

मंडप उभारणीच्या परवानगीसाठी महापालिकेने ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्याची लिंक महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. गतवर्षी सुमारे 250 मंडळांनी परवानगी घेतली होती. ऑफलाइन परवानगीची व्यवस्था प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात केली आहे. मात्र त्यात वेळ जात असल्याने मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी, असे आवाहन उपायुक्त (मुख्यालय) जी.जी. गोदेपुरे यांनी केले. त्याचबरोबर, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंडपाबाबत देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.

मंडप परवानगीसाठी हेल्पलाईन

मंडपाच्या ऑनलाइन परवानगीसाठी कोणतीही समस्या येत असल्यास पदाधिकार्‍यांनी 8097192868 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तेथे त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती गोदेपुरे यांनी दिली. तसेच, महावितरणकडून तात्पुरत्या वीज जोड़णीबाबत काही समस्या असल्यास महावितरणच्या वागळे इस्टेट कार्यालयातील ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या अधिकार्‍यांनी केले.

एकल वापराचे प्लास्टिक नकोच!

गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रयत्नशील राहावे. शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती आणावी. तसेच, प्रसादासाठी प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिकचे द्रोण-पिशव्या अशा एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर करू नये. त्यासाठी दंड होऊ शकतो, अशी माहिती महापालिकेच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.

महापालिकेच्या आरास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्व. गणेशोत्सव मंडळांसाठी दरवर्षी महापालिका आरास स्पर्धेचे आयोजन करते. त्यात आठ पारितोषिके दिली जातात. प्रथम क्रमांकास 10 हजार, द्वितीय 7500 व तृतीय क्रमांकास 6500 रुपये असे पारितोषिक असते. सर्व मंडळानी या स्पर्धेत सहभागी व्हावे. 2 सप्टेंबरपर्यंत मंडळांना माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करता येतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news