

डोंबिवली : राष्ट्रीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मंडळाच्या कर्तुत्वाची लक्तरे वेशीवर टांगली. कागदी घोडे नाचवणे आता बंद करा आणि प्रदूषणाला आवर घाला, अन्यथा येत्या काळात आंदोलनाची धार वाढेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना मंडळाला दिला आहे.
छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखील गाळे-पाटील यांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण येथील विभागीय कार्यालयात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचारी फक्त कागदोपत्री कारवाई आणि उपदेश देण्याशिवाय कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यामुळे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्लास्टिक पिशव्या, टाकाऊ बॅटऱ्या, अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कारखाने, पाणी बनवणारे कारखाने, चिंचपाडा, टिटवाळा व कल्याण परिसरातील जीन्स वॉश आणि रंग मिश्रित अनधिकृत कारखाने प्रदूषणाला जबाबदार आहेत. वालधुनी आणि उल्हास नदीत जलचर-भूचर-हवाईचरांच्या प्रकृतीला बाधा होईल, प्रदूषण पसरून रोगराई वाढण्याला केवळ आस्थापनाच जबाबदार नसून अशा आस्थापनांच्या बेपर्वा हरकतींना आळा घालण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ देखिल तितकेच जबाबदार आहे. प्रदूषणाला जबाबदार ठरलेल्या अस्थपनांवर कारवाया करण्या संदर्भात सातत्याने तक्रारी करून देखिल फक्त कागदी घोडे नाचवत उत्तर देणाऱ्या मंडळाने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. महानगरपालिका आणि महावितरण कंपनीशी पत्रव्यवहार केल्याचे मंडळाकडून सांगण्यात येते. अशा उत्तरांची पत्रे पाठवून मंडळ स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येते. कामात दिरंगाई आणि वेळ काढून नेण्यात पटाईत असलेले पूर्वीचे अधिकारी आणि सद्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बेपर्वा कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांना प्रादेशिक अधिकारी ज. शं. हजारे यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तूर्त मागे घेतल्याचे छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखील गाळे-पाटील यांनी सांगितले.
मंडळाकडून अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातीसह क्षेत्रा बाहेरील कार्यरत उद्योगांना वेळोवेळी भेटी दिल्या जातात. दोषी आढळल्यास कारवाई केली जाते. लेल्या उदयोगांवर कारवाई केली जाते. जानेवारी २०२४ ते आजतागायत एकूण ५३ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस, ३८ उद्योगांना प्रस्तावित आदेश, ४० उद्योगांना आंतरिम आदेश व १९ उद्योगांना बंदचे आदेश बजावण्यात आले आहेत.
अवैधरित्या सुरू असलेल्या बॅटरी उद्योगांच्या पहाणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने सदर परिसरातील पाच बॅटरी उद्योगांवर बंदची करवाई करण्यात आली आहे.
उल्हासनगरमधील दुकानांत प्लास्टिक पिशव्या सर्रास विकल्या जात असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिकेला सूचनांद्वारे कळविण्यात आले आहे.
मे. ब्लू जेट हेल्थ केअर या उद्योगाबाबत कारणे दाखवा नोटीस, शिवाय बंद बाबत निर्देश पारीत केले होते. सदर उद्योगासंबंधी राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रकरण दाखल आहे. लवादाने आयोगाने प्रकरण निकाली काढले असून यामध्ये सदर प्रकरणी पुढील कोणतेही निर्देश देण्याचे आवश्यकता नसल्याचे आदेशित करण्यात आले आहे.
कल्याणमधील चिंचपाडा-द्वारली, मलंगड रोड, मिरची आणि रुद्र ढाबाच्या मागे, तसेच टिटवाळ्यातील गोवेली चौक - सीएनजी पंप अशा अनेक ठिकाणी अनधिकृत चालू असलेल्या जीन वॉश करणाऱ्या कंपन्यांची पहाणी करून आढळलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने ३० जीन वॉशिंग उद्योगांना बंद करण्याचे आदेश पारित केले आहेत. तसेच अंबरनाथ क्षेत्रातील एकूण १० जीन वॉशिंग उद्योगांना उद्योग बंद करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.