

ठाणे : विधी व न्याय विभाग अंतर्गत असलेल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाची वेबसाईट पुन्हा बंद पडल्याने पूर्ण कामकाजच ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे कामकाजाच्या अनेक फाईल्स खोळंबल्या आहेत.
विधी व न्याय विभाग अंतर्गत असलेल्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या साईटचा प्रॉब्लेम हा वर्षानुवर्षे सुरू आहे. कधी साईट चालते तर कधी बंद होते. नागरिकांच्या सोयीसाठी जलद गतीने न्याय मिळावा व सुविधांचा लाभ मिळावा यासाठी विधी व न्याय विभागानेसुद्धा आपल्या सगळ्या साईट या संगणकीकृत केल्या. त्यामध्येच विधी व न्याय विभाग अंतर्गत चालवण्यात येणारे धर्मदाय आयुक्त कार्यालय येथील प्रकरणे सुद्धा तत्काळ निपटारा करण्यात यावीत, या उद्देशाने ऑनलाईन करण्यात येतात. विशेषतः नवीन नोंदणी ट्रस्टची नोंदणी आदी सर्व प्रकरणे ही ऑनलाईन करावी लागतात. जलद गतीने कारभार होण्यासाठी शासनाने कामकाज संगणीकृत करण्याची ठरवले. मात्र विधी व न्याय विभाग अंतर्गत चालवण्यात येणार्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाची वेबसाईट काही दिवसांसाठी चालू होते तर पुन्हा बंद होते अथवा अतिशय संथगतीने चालते.
मागील दहा पंधरा दिवसांपासून ही वेबसाईट बंद होती. पुन्हा तीन-चार दिवसांसाठी चालू झाली आणि बुधवार 1 एप्रिलपासून पुन्हा बंद झाली. मुंबईत लाखो ट्रस्ट नोंदणीकृत आहेत. तसेच नवीन ट्रस्ट दररोज नोंदणीसाठी येत असतात; परंतु साईटच्या अतिशय संथ गतीमुळे इथली प्रकरणे सात ते आठ महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे समजते.
कार्यालयीन वेबसाईट बंद असल्यामुळे सगळा कारभाराच विस्कळीत झालेला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी केल्या, पण त्यामधून म्हणावा तसा उत्तम प्रतिसाद मिळत नाही. याबाबत विधी व न्याय विभागाने मुंबई हायकोर्टाच्या धर्तीवर इथली वेबसाईट सुरळीत करावी, ही मागणी होत आहे. याबाबतीत एका निवेदनाद्वारे अॅड. नागनाथ गायकवाड यांनी तक्रार मांडली आहे.