

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिच्या 10 / ई प्रभागातील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बहुमजली इमारतीवर पाडकमाची कारवाई करण्यात आली. सदर इमारत हटविल्यामुळे स्टार कॉलनी ते समर्थ चौक रस्त्याचे लवकरच रुंदीकरण होणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड व अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या निर्देशांनुसार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली 10/ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलनी ते समर्थ चौक या 24.00 मीटर रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ओम रेसिडेन्सी या तळ + 4 मजली इमारतीच्या बांधकामावर मंगळवारी (दि.10) रोजी निष्कासनाची कारवाई सुरु केली.
सदर इमारतीमधील 16 सदनिकारक आणि 6 गाळेधारकांना नोटीसा देऊन इमारत रिकामी करण्यात आली होती. त्यानंतर सदर इमारतीवर पाडकामाची कारवाई करणे सुकर झाले. ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात हाय जॉ क्रश मशीन, 1 पोकलेन आणि 10 मजूरांच्या साह्याने करण्यात आली. ही कारवाई सदर इमारत पूर्ण भुई सपाट होईपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती 10 / ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी दिली.