

ठाणे : निळजे उड्डाण पुलाच्या नवनिर्मितीसाठी पाच दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता. बुधवार (दि.5) पासून घेण्यात आलेला ब्लॉक सोमवार (दि.10) आज संपणार आहे. मात्र हा ब्लॉक संपण्याआधीच रेल्वे प्रशासनाने उड्डाण पुलाचे काम पूर्ण केले आहे. या पुलावर प्रशासनाकडून डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. सोमवार (दि.10) सायंकाळपासून पुलावरून नियमितपणे वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. त्यामुळे पाच दिवसांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणारे वाहनचालक पलावा येथील वाहतूक कोंडीमधून मुक्त होणार आहेत.
कल्याण शीळ रस्त्यावरील रेल्वेच्या उड्डाण पुलाचे काम रेल्वेकडून जलदगतीने सुरु करण्यात आले होते. 100 रेल्वे कामगारांसह 20 रेल्वेचे अभियंते कामासाठी तत्पर होते. अखेर सोमवारी (दि.10) या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. दिल्ली ते जेएनपीटी या डीएफसीसी प्रकल्पांतर्गत या उड्डाणपुलाचे काम करण्यात आले आहे.
पुलाच्या प्रिकास्ट गार्डरचे काम देखील पूर्ण झाले आहे. उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने पुलावरील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांचा ट्रॅफिक ब्लॉक संपण्याआधी पुल वाहनचालकांच्या सेवेत रुजू होणार आहे. सोमवारी (दि.10) दुपारपर्यंत पुलाच्या वरील रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर रेल्वेच्या अभियंत्यांकडून चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर पुलावरून सायंकाळी वाहतूक सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अभियंत्यांनी दिली आहे. सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या वाहनचालकांचा या पुलाच्या परिसरातून कोंडीमुक्त प्रवास होणार आहे.