

डोंबिवली (ठाणे) : कल्याणजवळ असलेल्या उल्हास आणि काळू नदीच्या संगमावर अटाळी, वडवली भागात 60 एकर परिसरात घनदाट वृक्षवल्ली पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी या वनराईचे संवर्धन केले आहे. या वनराईत विविध प्रकारची जैवविविधता पाहण्यास मिळते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने या वनराईत पक्षी अभयारण्य उभारणीसाठी प्रयत्न करावा, या मागणीकडे कल्याणमधील निसर्गप्रेमी तथा काळा तलाव भागाचे माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी आयुक्त अभिनव गोयल यांचे लक्ष वेधले आहे. येथील जंगलपट्ट्यात विविध पक्षांसह मोरांचा मुक्त संचार आढळून येतो.
पक्षी अभयारण्य उभारणीसाठी अटाळी, आंबिवली, वडवली परिसरातील ग्रामस्थ, महसूल, वन विभागाचे केडीएमसी प्रशासनाने सहकार्य घेतले तर हा प्रकल्प विनाअडथळा लवकर मार्गी लागू शकतो, अशीही सूचना माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. वडवली, अटाळी भागात उल्हास नदी आणि काळू नदीच्या संगमावर 60 एकर परिसरात पाण्याची उपलब्धता असल्याने जानेवारी ते मेपर्यंत या भागातील वनराई पाना-फुलांमुळे टवटवीत असते. विविध प्रकारचे स्थानिक पक्षी, प्राणी, तसेच स्थलांतरित पक्षांचा देखिल या भागात अधिवास असतो. अनेक पक्षी प्रेमी, तसेच पक्षी प्रेमी छायाचित्रकार, पर्यावरणप्रेमी संस्था या भागात भ्रमंतीसाठी येतात.
कल्याण परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना निसर्गातील जैवविविधता अनुभवण्यासाठी कार्यानुभवाच्या तासात अटाळी व वडवली भागातील वनराईत घेऊन येतात.या भागात महानगरपालिकेने काही वर्षांच्या काळात 50 एकर भागात वनराई फुलवली आहे. 100 एकर परिसरात वनराईचा हरित पट्टा कल्याण खाडी किनारा भागात आहे. कल्याण, टिटवाळा, आंबिवली, भागातील नागरिक दररोज या भागात फिरण्यासाठी येतात. या भागात मोरांचे नियमित दर्शन झाले होते. विविध प्रकारच्या पक्ष्यांचा सकाळ-संध्याकाळ कलकलाट या भागात असतो. या व्यतिरिक्त विविध प्रकारचे तितर, लावरी, होला अशा रानपक्षांचाही या भागात अधिवास आहे. हे घनदाट जंगल अधिक संरक्षित केले तर याठिकाणी चांगले पक्षी अभयारण्य उभे राहू शकते, अशी मागणी माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी पालिकेकडे केली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 125 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात टिटवाळा, शहाड कंपनी परिसर, तसेच पश्चिम डोंबिवलीतील खाडी किनारा आणि ठाकुर्ली परिसरात जंगल शिल्लक आहे. उर्वरित भागात नवीन बांधकामांसाठी झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे. शहराची फुप्फुसे म्हणून अटाळी, वडवली भागातील जंगल संरक्षित करून तेथे पक्षी अभयारण्य उभारणीसाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. अनेक निसर्गप्रेमींनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.