Thane News | प्रशासकीय यंत्रणांनी जबाबदारीचे भान ठेवून जनसेवेची कामे करावीत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश; पालघरमध्ये पहिलाच लोकदरबार
पालघर
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पहिला जिल्ह्याचा लोक दरबार घेण्यात आला. Pudhari News Network
Published on
Updated on

पालघर : राज्याचे मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची जनतेप्रती जशी जबाबदारी आहे, तशी जबाबदारी शासकीय अधिकार्‍यांनीही निष्ठेने व चोखपणे बजावणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Summary

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.9) सरनाईक यांनी पहिला जिल्ह्याचा लोक दरबार घेतला, यावेळी ते बोलत होते. दरम्यान जनतेच्या सेवेसाठी आम्ही असून प्रशासकीय यंत्रणांनीही त्याच जबाबदारीचे भान ठेवून जनसेवेची कामे प्राधान्याने करावीत, असे सरनाईक यांनी शासकीय यंत्रणांना संबोधन करताना सांगितले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर येथे आयोजित केलेल्या पहिल्याच लोक दरबारामध्ये चारशेपेक्षा जास्त तक्रारी आल्या. या लोक दरबाराला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या तक्रारी समोर आल्यानंतर समोरासमोर अधिकारी वर्ग व अर्जदार नागरिक यांची भेट घालून देत ते प्रश्न सोडवण्याची पद्धत सरनाईक यांनी अवलंबली. यामुळे नागरिकांच्या समस्यांचा निपटारा व अर्जाच्या तक्रारीची प्रत्यक्ष वस्तुस्थिती अर्जदारांना कळण्यास मदत झाली. नागरिकांच्या समस्या सोडवण्यात युतीच्या घटक पक्षांमध्ये स्पर्धा नसून जनसामान्यांच्या समस्या सोडवणे हा युती सरकारचा धर्म असल्याचे सरनाईक यांनी म्हटले.

पालघरच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरटीओच्या कामासाठी वसईतील विरार भाटपाडा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. ही बाब ग्रामीण भागातील नागरिकांना त्रासदायक असून पालघरच्या ग्रामीण भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे नवीन कार्यालय स्थापन करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. लवकरच या कार्यालयाच्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याची घोषणाही त्यांनी येथे केली.

उमरोळी गावाच्या परिसरात दहा एकर जागेत हे कार्यालय उभारण्यात येणार असून हे कार्यालय उभारल्यानंतर एम एच 59 हा नवीन वाहन पाटी क्रमांक आणला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. या ठिकाणी पालघर ग्रामीण भागाच्या वाहनांच्या चाचपणीसह आरटीओशी संबंधित सर्व कामे तसेच टेस्टिंग ट्रॅक उभारण्याच्या कामालाही याच वर्षात सुरुवात केली जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले. या नवीन कार्यालय स्थापनेसाठी सरनाईक यांनी मंजुरी दिली असून पुढील आठवड्यात शासन निर्णय काढला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

एसटी ही ग्रामीण भागाचा कणा आहे. त्यामुळे जुन्या एसटी मोडीत काढत नवीन एसटी बसेस राज्यासाठी घेतल्या जाणार आहेत. पालघर जिल्ह्यालाही नवीन बसेस दिल्या जातील व प्रवाशांचा प्रवास सुखकर केला जाईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटीची प्रतिमा जनसामान्यांमध्ये वेगळी आहे, मात्र ही प्रतिमा बदलून ती चांगली केली जाईल व एसटी यंत्रणेचा कायापालट करण्याचे काम आम्ही करू असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागांमध्ये रस्ते नसल्याने एसटी बसेस जाऊ शकत नाहीत त्यामुळे आधी रस्ते तयार करा जेणेकरून तेथे बसेस चालवणे सोयीचे होईल, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जव्हार व डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी, जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख, उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

नगरपरिषदेने अनधिकृत बॅनरवर कारवाई केली नाही

शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पालघर शहरासह जिल्ह्यात तुफान बॅनरबाजी दिसून आली. या बॅनरमध्ये अनेक शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांची छायाचित्रे होती. तर काहींची छायाचित्रे या बॅनरवरून वगळल्याने शिवसेनेतील अंतर्गत वाद या निमित्ताने समोर दिसून आले. कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर सर्रासपणे विद्युत पथदिव्यांच्या खांबांना लावल्याचे दिसले, मात्र नगरपरिषदेने या अनधिकृत बॅनरवर कारवाई केलेली दिसून आली नाही.

तासाभरात मिळाले जात पडताळणी प्रमाणपत्र

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या लोक दरबारमध्ये पालघर तालुक्यातील धनसार येथील एका विद्यार्थिनीने जात पडताळणी प्रमाणपत्र प्रलंबित राहिल्याने आपले शैक्षणिक वर्ष वाया जाईल, असे मंत्री सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सरनाईक यांनी जात पडताळणी समितीच्या अधिकार्‍यांना बोलावून लोक दरबार संपण्याच्या आधी या विद्यार्थिनीचे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. त्यानंतर एका तासाभरात हे जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध झाल्याने ते मंत्र्यांनी संबंधित विद्यार्थिनीला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news