

ठाणे : कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंब्रा परिसरात असलेल्या जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून एक महिला या घटनेत जखमी झाली आहे. तर दुसरीकडे किसननगर परिसरात भागातही जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत जिवीत हानी झालेली नाही. या धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य असलेल्या १७ कुटुंबियांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तर या इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारतींमधील रहिवाशांनाही इमारती खाली करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. कल्याणप्रमाणे ठाण्यातही धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असून अजूनही या धोकादायक इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत. मंगळवारी (दि.27) रोजी १२ वाजताच्या सुमारास मुंब्रा कौसा परिसरात रोझ गार्डन ही तळ अधिक चार मजल्यांची २५ वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीच्या 'ए' विंग मधील पहिल्या मजल्यावरील रूम क्रमांक १०१ मध्ये सय्यद शबनम या राहत असून रूममधील प्लास्टरचा काही भाग पडल्याने या घटनेत त्या जखमी झाल्या आहेत. त्याच्या उजव्या हाताला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. रोझ गार्डन ही इमारत सी २ बी या श्रेणीतील असून इमारत रिकामी न करता तिची दुरुस्ती होऊ शकते.
दुसरीकडे किसन नगर परिसरातील तळ अधिक ३ मजल्याची जवळपास ५० ते ६० वर्ष नंदादिप नावाची अतिशय जुनी इमारत आहे. मंगळवारी (दि.27) २:२५ वाजताच्या सुमारास या इमारतीच्या ३ छताच्या व तिसऱ्या मजल्याच्या जिन्याच्या गॅलरीचा काही भाग कोसळला . सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत झाल्याने इमारतीतील एकूण १७ कुटुंबांना सुरक्षेच्या दृष्टीने हाजूरी रेंटल या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने लगतच्या दोन इमारतीमधील सर्व रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. संततधार पावसामुळे ठाण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न मात्र चांगलाच गंभीर झाला आहे.