Thane News : ठाणे महापालिकेत साडेतीन हजार कोटींचा टीडीआर घोटाळा; जितेंद्र आव्हाडांचा आयुक्तांवर 'गुलाम' असल्याचा गंभीर आरोप

‘अग्निशमन दलाच्या कंत्राटीकरणाचा डाव’
Jitendra Awhad |
जितेंद्र आव्हाड. Pudhari Photo
Published on
Updated on

ठाणे : ठाण्यातील वन विभागाच्या डोंगरावर पार्क उभारण्याचे दाखवून साडेतीन हजार कोटी रुपयांचा टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) देण्याचा मोठा घोटाळा ठाणे महापालिकेत झाला आहे. त्यामुळे वन विभाग आणि घोडबंदर रोडवरील काही कंपन्यांच्या जमिनीवर दिलेल्या टीडीआर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच महापालिका आयुक्त हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर टीडीआर घोटाळे झाले असून याप्रकरणी न्यायालयानेही पालिकेला फटकारले आहे. घोडबंदर रोडवरील एका कंपनीच्या जागेवरील साडेतीन हजार कोटींचा टीडीआर घोटाळा उघडकीस आला असून, न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात बोलताना डॉ. आव्हाड म्हणाले की, डोंगरावर पार्क दाखवून त्याबदल्यात टीडीआर देण्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. त्यामुळे या सर्व टीडीआर प्रकरणांची चौकशी करण्यात यावी. तसेच वन विभागाच्या जागेवरील टीडीआर घोटाळ्याप्रकरणी वनमंत्र्यांनी ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

अग्निशमन दलाचे खासगीकरण करण्याचा डाव?

गावदेवी भाजी मार्केटला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचा एक जवान आणि एक कर्मचारी आग विझवताना शहीद झाले. ठाणे अग्निशमन दलात सध्या अवघे ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. सत्ताधाऱ्यांना अग्निशमन दलाचे खासगीकरण करायचे आहे, म्हणूनच त्याचा ठेका देण्यासाठी हे दल मुद्दाम कमकुवत करण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. हा सर्व प्रकार माहीत असूनही आयुक्त काहीच करत नाहीत, कारण त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव आहे. महापालिका आयुक्त हे सत्ताधारी शिवसेनेचे गुलाम झाले आहेत, अशी बोचरी टीका आव्हाड यांनी केली.

दरम्यान, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अनधिकृतपणे बकऱ्यांचा बाजार भरवला जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोणतीही परवानगी नसताना केवळ राजकीय दबावापोटी हा बाजार भरवला जात असून, तो मुंब्रावासियांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना गावदेवी भाजी मार्केटच्या आग दुर्घटनेनंतर तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news