खानिवडे : वसईच्या अर्नाळा गावात पिसाळलेल्या श्वानाने दहशत माजवली असून एकाच दिवसात तब्बल 28 जणांचे लचके तोडले आहे. यामध्ये लहान मुले, महिला आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. तर या श्वानाने माणसांसह इतर सुस्थितीत असलेल्या श्वानांना देखील चावा घेतल्याने आता त्या श्वानांनाही रेबीजची लागण झाली आहे.
अर्नाळाकरांना यापुढे संरक्षण घेत घरा बाहेर पडावे लागत आहे. असे सामाजिक कार्यकर्त्या ज्योती कुडू यांनी सांगितले. अर्नाळा परिसरात बाहेरच्या श्वानांना पकडून सोडले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
प्रशासनाने ताबडतोब येथील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करून तसेच ज्यांना श्वानदंश झाला आहे. त्यांचा औषधोपचाराचा खर्च प्रशासनाकडून दिला जावा. तसेच भटक्या श्वानांना तातडीने रेबीज विराेधी प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे अशी मागणी ज्योती कुडू यांनी केली आहे.
विरार पश्चिमेतील अर्नाळा ग्राम पंचायत हद्दीत एका पिसाळलेल्या श्वानाने मोठी दहशत माजवली आहे. त्याने एकाच दिवसात 28 जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केले आहे. या सार्यांना आगाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र या घटनेचे एकाच दिवशी इतके रुग्ण आल्याने तेथील काही रुग्णांना लागलीच उपचार व्हावेत म्हणून वसई विरार महानगरपालिकेच्या तुलिंज येथील दवाखान्यात रेफर करण्यात आलेले आहे.