मिरा रोड : भाईंदरच्या उत्तन पातान बंदर येथील गॉडवील या मच्छीमार बोटीचा समुद्रात पंखा तुटल्याने बोट भरवादळात समुद्रात बंद पडली होती. त्यावेळी मदर इंडिया नावाची दुसरी बोट समुद्र किनारी बाहेर येत असताना त्यांनी त्या बोटीला बघितले. त्यावेळी त्या बोटीची मदत करत त्या बोटीला बांधून समुद्र किनार्यावर आणले आहे. समुद्रात अडकलेल्या बोटीला वेळेवर मदत मिळाल्याने बोटीत अडकलेल्या 18 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
भाईंदरच्या उत्तन पातान बंदर येथील गॉडवील या मच्छीमार बोटीचे नाखवा अलेक्झांडर डग्लस बेळू व इतर 17 जण हे मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले होते. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस व वादळी वारे सुरु झाल्यामुळे मच्छीमार बोटींना किनार्यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मासेमारीसाठी गेलेल्या बोटी परतू लागल्या आहेत. अलेक्झांडर यांची बोट देखील किनार्यावर परतण्यासाठी निघाली होती. बोट परतत असताना त्यांच्या बोटीचा पंखा तुटून पाण्यात पडला. त्यामुळे बोट पुढे चालू शकत नव्हती. पाऊस व वादळी वारे असल्यामुळे बोट समुद्रात हेलकावे खात होती. त्या बोटीत एकूण 18 जण अडकले होते. समुद्र किनार्यावर येणारी बोट भर समुद्रात बंद पडून 18 जण अडकल्याची माहिती रविवारी (दि.25) सकाळी 7 च्या सुमारास वायरलेस वरून मिळाल्यावर मदतीसाठी कोस्टगार्ड, पोलीस, मत्स्य विभागासह मासेमारीसाठी गेलेल्या बोटींच्या नाखवा यांना कळवले.
त्याचवेळी मदर इंडिया नावाची बोट देखील समुद्र किनार्यावर परत येत असताना त्यांना ही बंद पडलेली बोट दिसली. त्यावेळी त्या बोट चालकाने धाडस दाखवुन त्या बंद पडलेल्या बोटीला रस्सिने बांधून ती बोट समुद्र किनार्यावर आणण्यास मदत केली. या बोट चालकाच्या धाडसामुळे बोटीत अडकलेल्या 18 जणांचा जीव वाचवून त्यांना सुखरुप बाहेर काढले असल्याचे मच्छिमार नेते बर्नाड डिमेलो यांनी सांगितले आहे. रविवारी सकाळी 7 वाजता बोट बंद पडल्याची माहिती कोस्ट गार्ड यांना दिली परंतु त्यांच्याकडुन मच्छिमारांना वाचवण्यासाठी कोणतेही सहकार्य किंवा उत्सुकता दाखवण्यात आली नाही. कोस्ट गार्डने मच्छीमारांचा जीव वाचवणे महत्वाचे आहे. परंतु खोल समुद्रात अडकलेल्या मच्छिमार नौकेला कोस्ट गार्डकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली आहे.