डोंबिवली : सार्वत्रिक विधानसभा निवडणूका 2024 च्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.16) 144 - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पदाधिकारी आणि प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न झाली.
मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा मतदारांसाठी उपलब्ध राहतील, अशी ग्वाही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गुजर यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली.
मंगळवारी (दि.15) सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीची आदार्श आचार संहिता लागू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत बॅनर्स, पोस्टर्स व कटआऊटस् आदी काढण्याचे काम सुरू आहे. तथापी राजकीय पक्षांनी आपले बॅनर्स, पोस्टर्स व कटआऊटस् काढण्यास सहकार्य केल्यास शासकीय यंत्रणेवर ताण येणार नाही, असेही निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी स्पष्ट केले. राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असल्यास त्याची देखील रीतसर परवानगी घ्यावी, अशा सूचना गुजर यांनी या बैठकीत दिल्या.
नामनिर्देशन अर्ज हे निशुल्क उपलब्ध राहणार आहेत. 1 उमेदवार 4 अर्ज भरू शकतो. तसेच 1 उमेदवार 2 विधानसभा मतदार संघात आपले अर्ज दाखल करू शकतो. सभा, रॅलीसाठी पोलिस, आरटीओ, ट्राफीक आणि मनपाकडून मिळणाऱ्या आवश्यक सर्व परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे राजकीय पक्षांना निवडणूक कार्यालयात उपलब्ध होतील. 144 - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात मूळ 433 मतदान केंद्रे आहेत. यात 1 सहाय्यकारी (ऑक्झीलरी) मतदान केंद्र प्रस्तावित असल्याची माहिती विश्वास गुजर यांनी या बैठकीत देताना सर्व राजकीय पक्षांनी निवडणूकीकामी सहकार्य करावे, असे आवाहन केले. निवडणूकीसाठी शासनातर्फे करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत या बैठकीला उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.