विरार : नालासोपारा येथे एका दहा वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारा आचोळे पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. राज्यात बदलापूर घटनेचे अद्याप पडसाद उमटत असून अत्याचाराच्या घटनेने नालासोपारा, अंबरनाथ हादरले आहे. या दोन्ही घटनेमध्ये आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नालासोपार्यातील घटना; दोन जणांना अटक
रिक्षाचालकाला केली अटक, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
नालासोपारा येथे दहा वर्षीय पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. 2 सप्टेंबर रोजी परिसरात गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी ती गेली होती. तिथून घरी परत येत असताना घराच्या जवळच्या परिसरात दोन व्यक्तींनी तिला रस्त्यात अडवून तिला निर्जनस्थळी नेऊ न दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीचे कपडे रक्ताने पूर्णपणे माखले होते व तिची प्रकृती ठीक नसल्याने घरच्यांना मुलीसोबत गैरप्रकार घडल्याचा संशय आला. त्यानंतर मुलीची चौकशी केली असताना तिच्याबरोबर घडलेला सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने नालासोपारा पाचोळे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत दोन आरोपींना गजाआड केले. यापूर्वीही नालासोपारा पूर्वमध्ये 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. एकापाठोपाठ एक अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने पुन्हा एकदा महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंबरनाथ आणि बदलापुरात देखील लहानग्या मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढीस लागले असून आणखी एका 15 वर्षीय शाळकरी मुलीवर रिक्षाचालकाने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने पालकवर्गात चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी रिक्षाचालक आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्युशन क्लासवरून घरी रिक्षाने येत असताना रिक्षा चालकाने आपली रिक्षा पाईपलाईन रोडवरील डंपिंग ग्राउंडजवळ निर्जनस्थळी नेले व तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून 23 वर्षीय रिक्षा चालकास पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षा चालक आरोपीला न्यायालयाने 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रिक्षाचालक आरोपी अंबरनाथमधील नेवाळी परिसरात राहणारा असून त्याची ओळख परेड होणे बाकी असल्याने त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र या घटनेने अल्पवयीन मुलांच्या पालकांत चिंतेचे वातावरण आहे.