ठाणे : ठाणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना हातात डिजिटल ट्रॅकर घड्याळ हातात घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ५० टक्के कर्मचारीच आपल्या हातात हे डिजिटल घड्याळ घालत असल्याने उर्वरित ५० टक्के कर्मचारी कामावर हजर आहेत कि नाही, या कर्मचाऱ्यांवर वॉच कसा ठेवायचा असा प्रश्न पालिका प्रशासना समोर निर्माण झाला आहे.
कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी तसेच कामाच्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्वरित माहिती मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांच्या हाती डीजीटल घड्याळ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्वच्छता मोहीमे अंतर्गत विविध उपक्रम ठाणे पालिकेच्या माध्यामतून राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना हातात डिजिटल घड्याळ देण्यात आले आहे. पालिकेच्या आस्थापनेवर सुमारे १६०० सफाई कर्मचारी आहे. तर यामध्ये खासगी तत्वावरील सफाई कामगार वेगळे आहेत.
परंतु काही वेळेला हजेरी शेडवर हजेरी लावून कर्मचारी गायब होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे वाढल्या होत्या. अथवा आपल्या जागी दुसरा कर्मचारी दाखवून दुसरीकडे कामाला जात असल्याचेही दिसून येत होते. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने डिजिटल ट्रॅकर घड्याळ दिले आहेत. कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्याबरोबरच हे ट्रॅकर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणार आहे.
तीन वर्षापूर्वी ही योजना राबवण्यात आली आहे. परंतु दोन वर्षे कोरोना गेल्यानंतर या योजनेला काहीमा विलंब लागला आहे. आता बहुतांश सर्व कर्मचाऱ्यांना या डी-जीटल ट्रॅकर घड्याळ देण्यात आले खरे, मात्र केवळ ५० टक्के कर्मचारीच हे घड्याळ हातात घालत असल्याने पालिकेला केवळ ५० टक्केच कर्मचाऱ्यांना वॉच ठेवता येत आहे. उर्वरित कर्मचारी घड्याळ घालतच नसल्याने या कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवायचा कसा? असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
कर्मचारी प्रत्यक्ष कामावर आहेत कि नाही याची माहिती मिळावी यासाठीच हे ट्रॅकर घड्याळ कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र काही कर्मचारी हे घड्याळ घालत नाहीत. तर काही कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत. मात्र आता जे घड्याळ घालणार नाहीत त्यांचे वेतन मिळणार नाही असा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात येऊ शकतो असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.