

ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर २७० पेक्षा अधिक सूचना व हरकती येऊनही अपेक्षित कोणतेच बदल करण्यात आले नसल्याने विरोधकांनी या प्रभाग रचनेला विरोध दर्शवला आहे. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना ठेवण्यात आल्याने या विरोधात आता न्यायालयात जाण्याचा इशारा विरोधक आणि इच्छुकांकडून देण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षण तसेच अन्य कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाकडून निवडणूक सज्जता सुरू झाली आहे. त्यानुसार, त्यानुसार, सार्वत्रिक निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनांवर नागरिकांकडून आलेल्या २७० हरकती व सुचनांवर सुनावणीचा फार्स उरकण्यात आला
होता. या सुनावणीनंतर नागरिकांच्या सूचना व हरकतींवर विशेष अधिकाऱ्याचे अभिप्राय नोंदवून पालिका प्रशासनाने महाराष्ट्र महापालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५ (३) च्या तरतुदीखाली अंतिम प्रभाग रचना निश्चित केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेत एकूण ३३ प्रभागांमध्ये सदस्यांची संख्या १३१ आहे. यात, चार सदस्यीय प्रभाग संख्या ३२ असून ३ सदस्यीय प्रभागांची संख्या १ असणार आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर झाली आहे. या अधिसूचनेतील प्रभाग निहाय मतदारसंघाची रचना महापालिकेच्या वेबसाईटवर सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. तसेच कार्यालयीन वेळेत प्रभाग समिती आणि ठाणे मनपा मुख्यालय येथेही प्रभाग रचनेची अधिसूचना ठाणेकरांना पाहता येणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.