

ठाणे : स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि इच्छुक उमेदवारांच्या नाराजीचा विस्फोट झाला आहे. सर्वाधिक बंडखोरी शिवसेनेत झाल्याने सेना उमेदवारांसह भाजप उमेदवारांची चिंता वाढली आहे. त्यात शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत आणि माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्या पत्नीला सेनेची उमेदवारी मिळाली असताना बंडखोरी करीत शिवसेना उमेदवार पाडण्याचा विडा उचलला आहे. तसेच दहा माजी नगरसेवक आणि तीन पदाधिकाऱ्यांमुळे सर्वाधिक भाजप उमेदवार अडचणीत आले आहेत.
शिवसेनेच्या महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेच्या भूषण भोईर आणि मधुकर पावशे या माजी नगरसेकांची विकेट पडली आहे. तो राग मनात धरून भोईर आणि पावशे यांनी अपक्षांचा पॅनल उभा करून शिंदे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. तसेच भाजपचे दत्ता घाडगे यांनी बंडखोरी केली आहे. भूषण भोईर यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे, तरी देखील त्यांनी बंडखोरी करीत शिंदे विरुद्ध भोईर वादाला अधिक हवा दिली आहे.
याच प्रकारे प्रभाग एकमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांचे कट्टर विभाग प्रमुख रवी घरत यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बंडखोरी केली आहे. घरत यांनी खुलेआम उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक सिद्धार्थ ओवळेकर यांना आव्हान दिल्याने शिंदे आणि सरनाईक गटातील शीतयुद्ध उघड झाला आहे. गंमत म्हणजे घरत यांच्या पत्नी नम्रता घरत ह्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून ओवळेकर यांच्यासोबत निवडणूक लढवीत आहेत. एकाच पॅनलमध्ये अशा प्रकारे पती-पत्नी एकमेकांविरोधात निवडणूक लढवित असल्याचे चित्र आहे.
नौपाड्यात भाजपचे उमेदवार सुनेश जोशी यांच्या विरोधात शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नाकती यांनी बंडखोरी केली आहे. त्याचबरोबर भाजप उमेदवार उषा वाघ यांना सेनेच्या माजी नगरसेविका शांता सोळंकी यांनी बंडखोरी करीत आव्हान दिले आहे. याच प्रभागात सेनेचे उमेदवार पवन कदम यांच्या विरोधात विकास दाभाडे यांनी बंड केले.
कळव्यात सेनेच्या अनिता गौरी यांच्या विरोधात माजी नगरसेविका सुरेखा पाटील, सेनेच्या नगरसेविका प्रमिला किणे यांनी सेनेच्याच मनाली पाटील यांच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत. ह्या दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. उमेदवारी नाकारल्याने सेनेच्या माजी नगरसेविका मंगल कळंबे आणि सेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी नगरसेविका रागिणी बेरीशेट्टी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने बंडाळी केली आहे. सेनेच्या एका मंत्र्यांनी त्यांच्या उमेदवारीस प्रखर विरोध केल्याने बेरीशेट्टी यांच्याऐवजी सीताराम राणे यांना उमेदवारी देण्यात आली.
सेनेचे माजी नगरसेवक संजय सोनारे यांच्या पत्नीने भाजप उमेदवाराच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे माजी महापौर हरिचंद्र पाटील यांचा मुलगा विकी पाटील आणि विभाग प्रमुख नितीन लांडगे व त्यांची पत्नी प्रणोती लांडगे यांनी प्रभाग चारमध्ये भाजपचे दोन उमेदवार आणि सेनेच्या एक उमेदवारविरोधात बंडखोरी केली आहे. त्याच बरोबर शिवसेनेच्या माजी नगरसेविका निशा पाटील यांची उमेदवारी कापून भूषण भोईर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने पाटील यांनी बंडखोरी केल्याचे दिसून येते. एकंदरीत ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना तसेच भाजप विरुद्ध शिवसेना अशी बंडखोरी झाल्याचे दिसून येते. याचा फटका कुणाला बसतो याचे चित्र १६ जानेवारीला स्पष्ट होईल.