

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये आज मतदानाला शांततेत सुरुवात झाली असली, तरी आडीवली, ढोकळी, पिसवली आणि काकाचा ढाबा परिसरात उमेदवारांच्या कार्यालयांबाहेर मतदारांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेषतः पिसवली भागात रस्त्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदारांसाठी स्टॉल उभे केल्याने वाहनांची ये-जा अडथळली गेली आणि लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
या गर्दी व कोंडीची दखल घेऊन मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्यासह पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी उमेदवारांच्या कार्यालयाबाहेरील गर्दी पांगवण्यास सुरुवात केली असून वाहतूक सुरळीत करण्यासाठीही उपाययोजना राबवल्या जात आहेत.
दरम्यान, “मतदारांना निवडणूक आयोगाकडून/स्थानिक उमेदवारांकडून मतदानाच्या स्लिप निवडणुकीआधीच पोहोचल्या असताना देखील कार्यालयांबाहेर गर्दी का?” असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कार्यालयांच्या परिसरात मतदारांना पुन्हा स्लिप देण्याच्या नावाखाली जमलेली गर्दी ही केवळ माहिती देण्यासाठी आहे की त्यामागे “लक्ष्मी दर्शन”सारखा काही प्रकार तर घडत नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आणि स्थानिक प्रशासनाने मतदान केंद्रांच्या आसपास उमेदवारांचे स्टॉल, कार्यालयांबाहेरची रांग, तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पारदर्शक व निर्भय मतदानासाठी पोलिस बंदोबस्त वाढवणे, सीसीटीव्ही/व्हिडिओ निरीक्षण, आणि नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.